कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारने बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आले आहे अशी माहिती पुढे आली आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त प्रखर विरोध होत आहे. हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यातील २९ तालुके आणि ३७० गावांतून जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शासनाने मान्यता दिल्याची माहिती देण्यात आली आहे. पण शेतकऱ्यांचा विरोध पाहता भूसंपादनाच्या विषयावरून पुन्हा एकदा राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. (Kolhapur excluded from Shakti Peeth)
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये वर्ध्यातील पवनार ते सांगली अशा भूसंपादनेला मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला. त्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव आणि इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही या महामार्गाला विरोध केला. (Kolhapur excluded from Shakti Peeth)
शक्तीपीठ महामार्गात कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण सहा तालुके आणि पाच आमदारांच्या मतदारसंघातील पिकाऊ जमीन जात असल्याने शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने शक्तीपीठ विरोधात जोरदार आघाडी उघडली असून शेतकरी वर्गाकडून शक्तीपीठला विरोध होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह सांगलीचे खासदार प्रतिक पाटील यांनी शक्तीपीठला विरोध दर्शवला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी शक्तीपीठला समर्थन दिले आहे. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ होणार नसल्याचे म्हटले आहे. पण राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी आग्रही आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्याची गोची झाली आहे.
विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण ८०५ किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर २६ ठिकाणांवर इंटरचेंज असेल. ४८ मोठे पूल, ३० बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल ८६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. (Kolhapur excluded from Shakti Peeth)