पुणे : प्रतिनिधी : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (वय ६८ ) यांचे शनिवारी पुण्यामध्ये निधन झाले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उद्या रविवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार होणार आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या मातोश्री आहेत. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमात त्यांनी सिंधुताई यांची भूमिका साकारली होती. तर, सध्या स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. (Jyoti Chandekar)
ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात एका हिंदी सिनेमातील छोट्या भूमिकेतून केली. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. गेली ५० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या सिनेसृष्टीत सक्रिय होत्या. त्यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकात भूमिका करत नाट्यक्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर त्यांची अनेक नाटके गाजली. त्यांनी, ‘तिचा उंबरठा’, ‘ढोलकी’, ‘सुखांत’, ‘मी सिंधुताई सकपाळ’, ‘फुलवात’, ‘देवा’, ‘श्यामची आई’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी ‘छत्रीवाली’, ‘तू सौभाग्यवती हो’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. सध्या त्यांची ‘ठरलं तर मग’ ही मालिका चांगली गाजत आहे. (Jyoti Chandekar)
ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या दोघींनी एका सिनेमात एकत्र काम केले. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात त्या दोघींनी सिंधुताईंच्या आयुष्यातील दोन विविध पर्वातील भूमिका साकारल्या. या दोघींचेही त्यांच्या अभिनयासाठी कौतुक झाले होते. तसेच या कालावधीमध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ज्योती चांदेकर यांना मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. (Jyoti Chandekar)