बेळगाव : प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्र या उभय राज्यांमधील बससेवा बंद आहे. दोन्ही राज्यांतील बससेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. दोन्ही राज्यांतील बससेवा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुरक्षा याविषयी बेळगाव आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. (Inter State Bus Service)
या बैठकीत बेळगाव आणि कोल्हापूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. कर्नाटकच्या बस फक्त महाराष्ट्र सीमेपर्यंत तर महाराष्ट्राच्या बस कर्नाटक सीमेपर्यंत धावत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. बैठकीला बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते. (Inter State Bus Service)
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी कर्नाटकची बससेवा महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सुरू राहील. तेथून पुढे महाराष्ट्राच्या एसटी बसमधून प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोचवले जाईल.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आवश्यक ती उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांतील बसवर किंवा कर्मचाऱ्यावर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटीच्या चालकावर हल्ला करणाऱ्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनाही अशा घटनांत सहभागी होणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती रोशन यांनी दिली. (Inter State Bus Service)
महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा सुरळीत होण्यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कर्नाटकच्या बसना आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा :
शिवसेना, समिती कार्यकर्ते दहशतवाद्यांसारखे
कोल्हापूरसह ६० ठिकाणी सीबीआय छापे