Home » Blog » indians deported from US : भारतीयांची अमेरिकेतून हद्दपारी आणि नेतृत्वहीन जग

indians deported from US : भारतीयांची अमेरिकेतून हद्दपारी आणि नेतृत्वहीन जग

अमेरिकेत बेकायदेशीर राहणा-या १०४ भारतीयांना अमेरिकेने भारतात लष्करी विमानाने पाठवून दिले. नागरी विमानाने पाठवून दिले असते तर ही नागरी कारवाई म्हणून पाहता आले असते.

by प्रतिनिधी
0 comments
indians deported from US
  • राज कुलकर्णी

अमेरिकेत नव्या अवतारात स्थानापन्न झालेल्या डोनाल्ड ट्रंप यांच्या सरकारने आपल्या देशातील बेकायदेशीर स्थलांतरीत लोकांना देशातून हद्दपार केले आहे. अमेरिकेत बेकायदेशीर राहणा-या १०४ भारतीयांना अमेरिकेने भारतात लष्करी विमानाने पाठवून दिले. नागरी विमानाने पाठवून दिले असते तर ही नागरी कारवाई म्हणून पाहता आले असते. पण लष्करी विमानाने पाठवून अमेरिकेनेही त्यांच्या सरकारची लष्करी कारवाई असल्याचा संदेश जगाला दिला आहे. (indians deported from US)

अमेरिकेने याबरोबरच संयुक्त राष्ट्र मानवी हक्क कॉन्सिलपासूनही फारकत घेतली असून पँलेस्टाईन निर्वासितांसाठी कार्य करणा-या संस्थेचाही निधी बंद केला आहे.

अमिरिकेचा संकुचितपणा

एकेकाळी संपुर्ण जगाचा पालक आणि जगाची पोलिस म्हणून वावरणारा अमेरिका आज स्वत:ची ओळख संकुचित करत आहे. एकेकाळी जगातील सर्व मानव जातीचा कैवारी असल्याचा अविर्भाव असणारी अमेरिका केवळ देशांर्गत मतदारांचा विचार करताना दिसत आहे. (indians deported from US)

अमेरिकेची ही भुमिका पाहता ती एखाद्या देशातील नेतृत्वाने घेतलेली नसून तोच आजच्या जागतिक पातळीवरील राजकारणाचा शिरस्ता ठरला आहे. आपल्या देशाची प्रतिमा जगात काय असावी यापेक्षा देशांतर्गत देशातील सरकारची प्रतिमा लोकानुनयी कसे असेल हा विचार केंद्रस्थानी ठेवणारी बनली आहे.

जागतिक भान नाही

कोणे एके काळी जगावर कुठून तरी एखादे आंतराळातील धुमकेतुचे, प्रलयाचे वा महामारीचे संकट यायचे. किंवा एखाद्या परग्रहावरील लोक येवून पृथ्वीवर हल्ला करायचे. आणि नासा जगातील सर्व देशांशी सहकार्य करत ते संकट संपवित असत.

हॉलीवुडमधे यावर अनेक सिनेमे आहेत. पण आता ती स्थिती नाही. कारण जगातील प्रत्येक देशातील सत्ताधीश संकुचित होऊन आपल्या सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी मतदारांना खूष करण्याच्या प्रयत्नात आहेत. रशियामधे पुतीन असो वा भारतात मोदीजी. बांगलादेश, म्यानमार असो वा चीन सर्वत्र हीच स्थिती आहे.(indians deported from US)

संकुचितपणामुळे भारताची गोची

भारत सरकार बांग्लादेशी नागरिक असो वा रोहिंग्याना हद्दपार करण्याच्या प्रयत्नात असतील तर ते सरकार कोणत्या विचाराने अमेरिकेला भारतीयांच्या हद्दपारीस विरोध करणार आहेत. म्हणून सरकारने यावर मौन बाळगलं आहे.

आज जागतिक पातळीवर नेतृत्व करून जगातील सर्व देशांनी जागतिक मानवतावादाचे रक्षण कसे करावे हे जगाला सांगण्याची क्षमता असणारा एकही नेता जगात नाही.

सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव

याची पार्श्वभूमी पाहता, युरोपियन युनियनमध्ये माजलेली दुही आणि युनियनमधून बाहेर पडलेला ब्रिटन, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, जगभरातील देशांमध्ये वाढत चाललेला प्रादेशिकवाद आणि या सर्वांवर भारी पडलेला कोरोना… अशा जागतिक गोंधळाच्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे ती म्हणजे सर्वमान्य नेतृत्त्वाच्या अभावाची. (indians deported from US)

जगभरातील मोठमोठे नेते आपापल्या देशांपुरते मर्यादित ठरले असून, जगाला दिशा देईल असा दृष्टिकोन पूर्णपणे हरवला आहे. संकुचित नेते असलेल्या या दिशाहीन जगामध्ये आजवर प्रभावी असलेल्या संस्थाही आपले सामर्थ्य हरवून बसल्या आहेत.

जागतिक संघटना निष्प्रभ

संयुक्त राष्ट्रे(यूनो), कॉमनवेल्थ नेशन्स, आसियान, इंटरअॅक्शन कॉन्सिलसारख्या जागतिक संघटना आजघडीला निष्प्रभ झालेल्या दिसत आहेत. एकंदर जागतिक राजकारण नेतृत्वहीन झाले आहे.

आज जगातील बहुसंख्य देशात असा एकही नेता नाही की ज्याचा जागतिक पातळीवर दबदबा राहील. न्यूझीलंड, फिनलँडसारख्या देशांमधील नेतृत्व उदारमतवादी आणि प्रागतिक विचारांचे जरूर आहेत. परंतु त्यांचा जागतिक राजकारणावर बदल होईल, असा प्रभाव नाही.

अमेरिका, रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, भारत या जागतिक पातळीवर पूर्वी दबदबा असणाऱ्या देशातील नेतेही निव्वळ आपापल्या देशांच्या सीमांमध्ये आणि देशांतर्गत निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या लोकप्रिय भूमिकांपुरते मर्यादित झाले आहेत.

जगभरात विविध देशात लोकसंख्येचे स्थलांतर, बेकायदेशीर स्थलांतरीत, बहुनागरिकता, सीमारेषा आणि त्यांच्या ताब्यांबद्दलचे तंटे नवीन नाहीत. पण सर्व देशांना आपलेसे वाटणारे मार्गदर्शक नेतृत्व आज जागतिक पटलावर नसल्यामुळे विविध देशातील हे सर्व तंटे शिगेला पोचले आहेत.

ब्रिटिशांचे योगदान

आधुनिक कालखंड विसाव्या शतकाच्या मध्यात सुरू झाला असे म्हणतात. त्यावेळी जगाच्या सातबा-यावर ताबेदार म्हणून बहुतांशी क्षेत्रावर ब्रिटिशांचे नाव होते. ब्रिटिशांनी जगाच्या दोन तृतीयांश भागावर वसाहती निर्माण करून राज्य केले.

त्यांचे साम्राज्य आधुनिक कालखंडाच्या पुर्वीपासून असल्यामुळे प्रत्यक्ष नकाशे वगैरे बाबी अचूकपणे त्यांनीच तयार केल्या. त्यापूर्वी नकाशे व हद्दी नव्हत्या असे नव्हे, पण त्यात अचूकता अल्प प्रमाणात होती.

पृथ्वी गोल आहे की पसरट यांवर वादंग असणा-या मध्ययुगीन काळात अचूक नकाशे निर्माण होणे कठीण होते. पण ब्रिटिशांनी त्यांच्या सोईप्रमाणे त्यांच्या साम्राज्यातील जमिनीचे विभाजन करत कांही नवीन सीमारेषा आखल्या. तशाच काही नवीन जमिनी एकमेकांशी जोडत काही जुन्या सीमारेषा पुसल्या.

वादाचा वारसा

अशा वेळी केवळ भौगोलिक सीमारेषाच पुसल्या किंवा नवनिर्मिल्या जात नाहीत, तर नैसर्गिक, राजकीय आणि सांस्कृतिक संरचनाही अपरिहार्यपणे बदलतात. हे फक्त ब्रिटिशांनीच केले असे नव्हे तर फ्रेंच, हॉलंड, स्पेन, पोर्तुगाल आदी वसाहतवादी देशांनीही केलेले आहे. आजचे जगातले अनेक वाद किंवा तंटे या वसाहतवादी धोरणाचे अवशेष आहेत. यात ब्रिटिशांचा वाटा मात्र अर्थातच बराच मोठा असणे अगदी स्वाभाविक आहे.

ब्रिटिशांना त्यांची सत्ता सोडून जाताना त्यांनी पुसलेल्या जुन्या वा आखलेल्या नवीन सीमांवर, त्यांनी लुप्त केलेल्या राष्ट्रांवर किंवा नव्याने निर्माण केलेल्या राष्ट्रांवर वाद होणार याची त्यांना नक्कीच माहिती होती. पण, ते सोडून जाताना त्यांनी हा वादाचा वारसा मात्र जवळपास जगातील सर्वच देशांना दिला. अरब-पॅलेस्टाईन, इराण-इराक, इराक–कुर्दीस्तान असे अनेक वाद आजपर्यंत सुरूच आहेत.

केवळ आपल्या देशाचा विचार

जगाचा इतिहास पाहिला तर, अगदी शीतयुद्धाच्या काळातही आंतरराष्ट्रीय राजकारणात मोलाची भूमिका बजावणारे अनेक मोठे नेते होऊन गेले. जागतिक प्रश्नांबाबतीत या सर्व नेत्यांनी केवळ देश पातळीवर विचार न करता जागतिक भूमिकेतून विचार करून निर्णय घेतले हे सत्य आपण समजून घेतले पाहिजे.(indians deported from US)

परंतु, गेल्या तीस पस्तीस वर्षात जगातील एकाही देशात आपल्या देशाबरोबरच जागतिक विचार करणारे नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही, हे दुःखद वास्तव आहे. हा आरोप जगातील सर्वच देशातील नेत्यांवर करता येतो. जागतिक सामंजस्याच्या भुमिका घेऊन वाद कायमस्वरूपी मिटवून पुढील पिढ्यांना शांतता द्यायची की, त्याच वादाचे देशांतर्गत राजकारण करत जनाधार प्राप्त करायचा हे त्या त्या नेत्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे.

व्यापक व सहृदय विचारांची

भौगोलिक अस्मितांच्या भावनांवर स्वार होऊन मते मिळवून आपली आपापल्या देशांतील राजकारणात आपली पकड मजबूत करणे एवढ्याच गोष्टींत बहुसंख्य नेते गर्क झाले आहेत. त्यामुळे ते जागतिक नेते होऊन जगातील सर्व नागरिकांबद्दल व्यापक कल्याणाची भूमिका घेऊ शकत नाहीत. देशांतर्गत निवडणुका जिंकणे, हेच मुख्य उद्दिष्ट असणा-या या नेत्यांकडून जगाच्या व्यापक व सहृदय विचारांची अपेक्षा धरणेच अवघड झाले आहे.

जागतिक संघटनाही निष्प्रभ

एका बाजूला राजकीय नेत्यांचे अपयश समोर असताना जागतिक संघटनांचीही अवस्था वेगळी नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालये, आंतरराष्ट्रीय संस्था वा संघटना, लवाद सक्षमपणे व निरपेक्षपणे काम करतील तेव्हा या नेत्याची उणीव त्या भरून काढू शकतात. पण, त्याही निर्णयहीन आहेत. जागतिक पातळीवरील वाद सोडविण्याचे काम आंतरराष्ट्रीय न्यायालये वा आंतरराष्ट्रीय लवाद वा युनो सारख्या संघटना करत असतात. पण, या संस्था तटस्थपणे काम करत नाहीत म्हणून जगातील अनेक देशांचा यावर विश्वास नाही.(indians deported from US)

जागतिक शांततेला धोका

जगातील नेत्यांनीही आपले नेतृत्व आणि कर्तृत्व अधिक व्यापक केले तर जगातील अनेक वाद युद्धभुमीवर नव्हे तर राजनैतिक चर्चेतून सुटू शकतात. राष्ट्रवादाच्या कल्पना या साम्राज्य विस्ताराच्या अनुषंगाने विकसित करणारे नेते जो पर्यंत जगातील देशात निर्माण होत राहतील, तोपर्यंत असे संघर्ष हे सतत होत राहणार आहेच. जगभरात अशी धुमसती राष्ट्रे ही जागतिक शांततेला धोका बनत राहतील.

आज जग जागतिक नेत्याविना नेतृत्वहीन बनले आहे आणि नेते नसल्यामुळे जागतिक संघटनाही क्षीण झाल्या आहेत. त्यामुळे जग वरचेवर अधिक अशांत होत राहणार आणि भविष्यातील पिढी जगातील सर्वच नेत्यांना याचा जाब विचारणार हे नक्की आहे.

आजचे वर्तमान उद्या इतिहास म्हणून काळाकडून नोंदवला जाणार आहे. नेतृत्वहीनतेच्या खाईत जगाला लोटल्याबद्दल आणि त्याबद्दल निष्क्रीय राहिल्याबद्दल इतिहास आपल्या पिढीला कधीही माफ करणार नाही.

ही तर सुरुवात

अमेरिकेतून भारतीयांची हद्दपारी ही एक सुरूवात आहे. परकीय आणि मूलनिवासी यांच्या संघर्षासाठी पृथ्वीवरील संपुर्ण भुपृष्ठाला तयार रहावे लागणार आहे. कारण आज जे केवळ बेकायदेशीर स्थलांतरित स्वरूप देशाच्या नागरिकतेबाबत मर्यादित आहे ते धर्म, वंश, भाषा, वर्ण वा एखाद्या देशातील प्रांत वा प्रदेश यास्वरूपात विस्तीर्ण होऊ लागले तर ते मानव जातीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00