Home » Blog » भारताची टी-२० मालिकेत आघाडी

भारताची टी-२० मालिकेत आघाडी

तिसऱ्या ‘टी-२०’मध्ये दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी मात

by प्रतिनिधी
0 comments
IND vs SA

सेंच्युरियन, वृत्तसंस्था : तिलक वर्माचे नाबाद शतक आणि त्याला अभिषेक वर्माने दिलेली अर्धशतकी साथ यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या अंगलट आला. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाल्यानंतर तिलक आणि अभिषेक यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचली. अभिषेक २५ चेंडूंमध्ये ३ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा करून बाद झाला. तिलकने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. तिलकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक झळकावताना ८ चौकार व ७ षटकारांसह नाबाद १०७ धावांची खेळी केली.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ७ बाद २११ धावांपर्यंतच मजल मारता आली. आफ्रिकेकडून मार्को यान्सनने १७ चेंडूंमध्ये ४ चौकार व ५ षटकारांसह ५४, तर हेन्रिक क्लासेनने २२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा करून विजयासाठी प्रयत्न केले. मात्र अर्शदीपने या दोघांना बाद करून आफ्रिकेच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. अर्शदीपने ३७ धावांत ३ विकेट घेतल्या.

विक्रम- पराक्रम

  • भारताने या वर्षी आठव्यांदा ‘टी-२०’त दोनशे धावांचा टप्पा पार केला असून, याबरोबरच भारत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा दोनशे धावा करणारा संघ ठरला. भारताने आपलाच मागील वर्षीचा विक्रम मागे टाकला असून २०२३ मध्ये भारताने सात वेळा दोनशेहून अधिक धावा केल्या होत्या.
  • तिलक वर्मा हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी-२० मधील बारावा शतकवीर ठरला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकवीर भारताचे असून, त्याखालोखाल न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी सहा शतकवीर आहेत.
  • तिलक वर्मा हा भारताचा दुसरा सर्वांत तरुण टी-२० शतकवीर ठरला. त्याने २२ वर्षे ५ दिवस इतके वय असताना शतक झळकावले. भारतातर्फे सर्वांत तरुण शतकवीराचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर असून त्याने २१ वर्षे २७९ दिवस इतके वय असताना शतक ठोकले होते.
  • या सामन्यातील तीन विकेटसह अर्शदीप सिंगच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ९२ विकेट झाल्या असून, तो भारताचा सर्वाधिक टी-२० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने ५९ सामन्यांत ही कामगिरी करताना भुवनेश्वर कुमारला (८७ सामन्यांत ९० विकेट) मागे टाकले.

 

संक्षिप्त धावफलक : भारत – २० षटकांत ६ बाद २१९ (तिलक वर्मा नाबाद १०७, अभिषेक शर्मा ५०, हार्दिक पंड्या १८, अँडाईल सॅमिलाने २-३४, केशव महाराज २-३६) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २० षटकांत ७ बाद २०८ (मार्को यान्सन ५४, हेन्रिक क्लासेन ४१, एडन मार्क्रम २९, अर्शदीप सिंग ३-३७, वरुण चक्रवर्ती २-५४).

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00