Home » Blog » लखनौ : हिंसाचारात बळींची संख्या पाच

लखनौ : हिंसाचारात बळींची संख्या पाच

वीसवर पोलिस जखमी; उत्तर प्रदेशातील संभल शहरात तणाव कायम; अडीच हजार जणांवर गुन्हा

by प्रतिनिधी
0 comments
Bangladesh violence file photo

लखनौ; वृत्तसंस्था : संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान रविवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर सोमवारी सकाळपासून संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. दंगलीतील मृतांची संख्या पाच झाली आहे. वीसहून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या खासदारासह अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगलीचे पडसाद संसदेतही उमटले.

हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदीसारखी परिस्थिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलिस महासंचालक मुनिराज जी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने हिंसाचारग्रस्त भागात संचलन केले. शहरातील सर्व प्रमुख चौकांवर बॅरिकेड लावण्यात आले असून, प्रवेशाच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर या परिसरात बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. उद्यापर्यंत इंटरनेट बंद राहणार आहे. समाजवादी पक्षाचे खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभलमधील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदाराशिवाय समाजवादी पक्षाचे स्थानिक आमदार इक्बाल महमूद यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवर दंगलखोरांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह २५०० जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या संभळ शहरात अघोषित संचारबंदी आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये आणि संयम राखावा, असे आवाहन करण्यात येत आहे. रविवारच्या हिंसाचारानंतर अद्याप कोणतीही घटना समोर आलेली नाही. संभलच्या हिंसाचारग्रस्त भागात संपूर्ण मुरादाबाद परिक्षेत्रातील ३० पोलिस ठाण्यांचे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे जिल्हाधिकारी राजेंद्र पानसिया यांनी एक डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी केली आहे. पोलिस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींवर गँगस्टर कायदा आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रस्त्यावर फक्त पोलिस!

हिंसाचारानंतर शहरातील बाजारपेठा आणि दुकाने पूर्णपणे बंद आहेत. बाधित भागातील बहुतांश घरांना बाहेरून कुलूप आहे. पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, रस्त्यावर फक्त पोलिसच दिसत आहेत. इंटरनेट निर्बंधाचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार आज शाळांना सुट्टी आहे. परिस्थिती तणावपूर्ण राहिल्यास शाळांच्या सुट्ट्याही वाढवल्या जाऊ शकतात.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00