Home » Blog » तरुणांना रोजगाराबरोबरच वेतनवाढीसाठी प्रयत्नशील : ऋतुराज पाटील

तरुणांना रोजगाराबरोबरच वेतनवाढीसाठी प्रयत्नशील : ऋतुराज पाटील

तरुणांना रोजगाराबरोबरच वेतनवाढीसाठी प्रयत्नशील : ऋतुराज पाटील

by प्रतिनिधी
0 comments
Ruturaj Patil

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची दिनमान मराठी या चॅनलसाठी संपादक विजय चोरमारे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित सारांश.

कोल्हापूरः कोल्हापूर शहरालगत आयटी हब उभारून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच तरुणांना पुण्याच्या बरोबरीने वेतन मिळण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र दिनमानला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली. गेल्या पाच वर्षांत केलेली कामे आणि भविष्यातील विकासाच्या योजना घेऊन आपण मतदारांसमोर जात असल्याचे त्यांनी सांगितले.

ऋतुराज पाटील यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशीः

प्रश्नः निवडणुकीपूर्वी तुम्ही जी आश्वासने दिली होती किंवा संकल्प केले होते ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कितपत यश आले आहे?

ऋतुराज पाटीलः कोल्हापूर दक्षिण मतदार संघ हा शहर व ग्रामीण मध्ये विभागला आहे. शहराचे प्रश्न वेगळे आणि ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत. निवडून आल्यावर पहिले दोन महिने सत्ता स्थापन करण्यात गेले. त्यानंतर कोविडचे संकट आले. या काळात मतदार संघातल्या प्रत्येक घटकाला आधार देण्याचे काम आम्ही केले. महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा पीपीई कीट आम्ही कोल्हापूरमधील डाँक्टरांना दिले. एका बाजूला मास्क, मेडिसीन, हॅस्पिटल सर्व्हिस असेल यातून मदत करण्याचे काम केले. त्यानंतर महापुराचे संकट आले. यातून बाहेर पडलो तर सरकार बदलले. अशा काळात बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी सदैव उपलब्ध राहिलो.

प्रश्नःतुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरला त्यावेळी तुमची सर्वात महत्त्वाची घोषणा होती मिशन बेरोजगार. तुमच्या कार्यकाळात या संबंधात तुम्ही रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न केले आणि त्यात तुम्हाला कितपत यश आले ?

ऋतुराज पाटीलः आपण मिशन रोजगार ही संकल्पना आणली. कोल्हापुरातून आम्ही अनेक लोकांना विविध कंपन्यांमध्ये काम देण्याचे काम केले. जॉब फेअरच्या माध्यमातून १७, ५०० युवक युवतींनी सहभाग दाखवला. एका बाजूला स्किल ट्रेनिंगला प्रेरणा दिली. अनेक जणांना रोजगार देण्याचे काम केले. २५०० महिलांना स्किल ट्रेनिंग दिले. आगामी काळात कोल्हापूरमध्ये स्किल ट्रेनिंग सेंटर सुध्दा आणणार आहे.

प्रश्नः रोजगाराच्या संबंधांने दुसरा एक मुद्दा नेहमी येतो तो म्हणजे इथले आयटी क्षेत्रातील इंजिनिअर आहेत त्यांना कोल्हापुरात संधी, पुरसे वेतन मिळत नाही, अशावेळी मोठ्या पगारासाठी पुणे, मुंबई, बेंगलोरला जावे लागते. त्यासाठी काय करावे लागेल?

ऋतुराज पाटीलः कोल्हापूरातल्या शेंडा पार्क या परिसरात कृषी विद्यापीठाची ७५ एकर जागा आहे. या जागेबाबत महसूल विभागाशी आम्ही चर्चा केली आहे. मोठ्या कंपन्या जर कोल्हापूरमध्ये येणार असतील तर त्यांना ती जागा कमी दरात दिली पाहिजे. शेंडा पार्कची ही जागा कोल्हापूर शहराच्या बाहेर घ्यायची आणि ती ७५ एकर जागा कंपनींना विक्री करून आयटी हब तयार करून अनेक मोठ्या कंपन्यांना आमंत्रित करायचे. आपण प्रयत्न केले तर शेंडा पार्क च्या जागेत एक चांगले आयटी पार्क तयार होईल. रोजगारही उपलब्ध होतील आणि चांगले वेतनही मिळू लागेल.

प्रश्नःकोल्हापुरात उद्योग व व्यवसाय वाढ होण्यासाठी विमानाची सुविधा चांगली होण्याची आवश्यकता आहे….

ऋतुराज पाटीलः सतेज पाटील पालकमंत्री होते त्यावेळी भूसंपादनासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. यासाठी ६४ एकर जागा भूसंपादन करायची आहे, ती केल्यास एअरबस कोल्हापुरात लँड होईल, मोठे फ्लाईटस् येतील. तर या ६४ एकरच्या जागेत १८०० मालक आहेत. त्यातील ५० टक्के जागा आपण भूसंपादन केली आहे. त्यासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निधीसुध्दा वर्ग केला आहे. नेर्ली-तामगावला रस्ता जातो त्यासाठी पीब्लूडीच्या माध्यमातून २७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा रस्ता एआरपोर्ट मधून बाहेर काढतोय आणि एअरपोर्ट चे कंपाउंड आपण एनक्लोज करतोय. यात आदरणीय शाहू महाराज हे अध्यक्ष आहेत. येणारा काळात यात मोठी डेव्हपमेंट आपल्याला दिसेल.

प्रश्नःकुठल्याही मतदारसंघात पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न असते. पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही पाच वर्षात काय केले?

ऋतुराज पाटीलः २०१९ मध्ये माझ्या मतदारसंघात अनेक गावांत पाण्याचा मोठा प्रश्न होता. गांधीनगर, पाचगाव, आर के नगर, कंदलगाव, उचगाव व मोरेवाडी या तेरा गावात आम्ही नवीन स्कीम मंजूर केली आहे. सुरवातीला १३८ कोटींची स्कीम मंजूर झाली होती ती आता अधिकच्या वितरण व्यवस्थेसह ३४४ कोटीं केली असून आज गांधीनगर पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. ही योजना सुरू झाल्यास या गावांतून दिवसांतून चार तास पाणी येईल. जलजीवन मिशनच्या काही स्कीम पुढच्या एक वर्षांत पूर्ण होतील.

प्रश्नः कोल्हापूर ची क्रीडा परंपरा मोठी आहे. इथल्या क्रीडा क्षेत्रासाठी तुम्ही यासाठी काय केले ?

ऋतुराज पाटीलः गाव तिथे क्रीडांगण संकल्पनेतील काही अडचणी सोडवण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. महसूल कडून एनओसी घेतली आणि आता महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये गाव तिथे क्रीडागण मंजूर आहे. कोल्हापूर दक्षिण मतदार संघात १४ गावात क्रीडांगण उभे राहिले आहेत. राजोपाध्येनगरमधे बॅडमिंटन कोर्ट, बॉक्सिंग रिंग तयार केले आहे. पाचगावला क्रीडा संकुल तसेच इस्पुर्ली गावात केल्या गेलेल्या ग्राउंडमधून जवळपास १४ मुले पोलिस भरती झाली आहेत. हजारो युवक युवतीसाठी आमचे काम चालूच आहे.

ही मुलाखत @ Dinman Marathi (दिनमान मराठी) यू ट्यूब चॅनलवर पाहू शकता.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00