मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट पत्रकार आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे गुरुवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. (Dwarakanath Sanzgiri)
संझगिरी हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत होते. २००८ मध्ये ते मुख्य अभियंता पदावरून निवृत्त झाले. १९८० च्या दशकापासून क्रिकेटविषयीच्या लेखनामुळे संझगिरींनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. भारतीय संघाने १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी काही मित्रांसह एकच षटकार नावाचं पाक्षिकही सुरू केलं होते. याबरोबरच मराठीतील बहुतांश प्रमुख दैनिकांसाठीही त्यांनी क्रिकेटविषयक स्तंभलेखन केले.
भारतीय क्रिकेट संघाचे महत्त्वाचे दौरे, तसेच वर्ल्ड कपसारख्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांवेळी संझगिरी यांनी संबंधित देशात जाऊन वार्तांकन केले. खासगी मराठी वृत्तवाहिन्यांच्या उदयानंतर त्यांची समीक्षक म्हणूनही टीव्ही कॅमेऱ्यासमोरील उपस्थितीही लक्षणीय होती. अजित वाडेकर ते अजिंक्य रहाणे या भारतीय क्रिकेटपटूंच्या तीन-चार पिढ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. त्याचबरोबर, अनेक परदेशी क्रिकेटपटूंशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या लेखनामध्ये या क्रिकेटपटूंचे किस्से खुमासदार शैलीमध्ये वाचायला मिळत. क्रिकेटच्या तांत्रिकतेमध्ये न अडकता खेळाच्या अनुभवाला त्यांनी आपल्या लेखणीतून प्राधान्य दिले. हाच त्यांच्या लेखनाचा विशेष गुण ठरला. (Dwarakanath Sanzgiri)
काही वर्षे ते कर्करोगाने आजारी होते. या काळातही सोशल मीडियावरून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे. २०२३ च्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तथापि, शस्त्रक्रियेच्या अगोदरच्या दिवशीपर्यंत त्यांनी लेखन सुरू ठेवले होते. अलीकडेच भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशाबद्दल त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. क्रिकेटबरोबरच प्रवास, संगीत, चित्रपट या विषयांमध्ये त्यांची रुची होती. या विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तकेही गाजली. त्यांच्या नावावर तीसपेक्षा अधिक पुस्तके आहेत. माझी बाहेरख्याली, फिरता फिरता, फाळणीच्या देशात, भटकेगिरी, थेम्सच्या किनाऱ्यावरून ही त्यांची प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत. दरम्यान, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहून संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Dwarakanath Sanzgiri)
Extremely saddened to hear of the passing of Dwarkanath Sanzgiri. A friend of 38 years, so many shared memories and someone who wrote with so much beauty and style and colour. You visualised things when he wrote about them. What a fight against the forces that threatened to take…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) February 6, 2025
हेही वाचा :