Home » Blog » Deportee handcuffed : चाळीस तास बेड्या घातलेल्या अवस्थेत

Deportee handcuffed : चाळीस तास बेड्या घातलेल्या अवस्थेत

अमेरिकेतून अमृतसरला पाठवलेल्या भारतीयाची कहाणी

by प्रतिनिधी
0 comments
Deportee handcuffed

अमृतसर : ४० तास आम्ही बेड्या घातलेल्या आणि पाय साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत होतो. विमानात आम्हाला आमच्या सीटवरून एक इंचही हलू दिले नाही. वारंवार विनंती केल्यानंतर, आम्हाला वॉशरूममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यातही क्रू शौचालयाचा दरवाजा उघडत असे आणि आम्हाला अक्षरश: आत ढकलले जात असे…. हरविंदर सिंगनी आपली कहाणी सांगत होते. (Deportee handcuffed)

हरविंदर सिंग पंजाबच्या पंजाबच्या होशियारपूरमधील ताहली गावातील तरूण. बुधवारी अमेरिकेने परत पाठवलेल्या ‘बेकायदेशीर’ स्थलांतरितांपैकी एक. अमृतसरच्या विमानतळावर उतरलेल्या पहिल्या तुकडीतून भारतात आलेला.

हा प्रवास “नरकापेक्षा वाईट” होता. हरविंदर सांगतो, या ४० तासांत आम्हाला नीट खायलाही मिळाले नाही. आम्हाला हातकडी घातलेल्या अवस्थेतच खायला लागत होते. हा प्रवास केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही भयंकर वेदनादायी होता… एका दयाळू क्रूने मात्र आम्हाला फळे खायला दिली. (Deportee handcuffed)

आठ महिन्यांपूर्वी “डंकी” मार्गाने हरविंदर अमेरिकेत गेला होता. त्याची पत्नीही आनंदी होती. कारण आता चांगले दिवस येतील, असे त्यांना वाटत होते. अमेरिका बेकायदा राहणाऱ्यांना परत त्यांच्या देशात पाठवणार असल्याचे वृत्त कानावर पडताच हरविंदरला धक्का बसला. त्याने आपल्या पत्नीला दिलेल्या चांगल्या आयुष्याच्या वचनाचा विचार करत राहिल्याने त्याला झोप येत नव्हती.

जून २०२४ मध्ये हरविंदर आणि त्याची पत्नी कुलजिंदर कौर यांनी एक निर्णय घेतला. त्यांना दोन मुले आहेत. दूध विकून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. परिस्थिती खूपच बेताची होती. एका दूरच्या नातेवाईकाने ४२ लाखांच्या बदल्यात हरविंदरला डंकी मार्गाने नव्हे तर कायदेशीररीत्या १५ दिवसांत अमेरिकेला नेण्याची ऑफर दिली. ही रक्कम गोळा करण्यासाठी कुटुंबाने त्यांची होती ती एकरभर जमीनही गहाण ठेवली. खाजगी सावकारांकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घेतले. मात्र थोड्याच दिवसांत त्यांचे स्वप्न भंगले. (Deportee handcuffed)

Deportee handcuffed

s. jaishankar

निर्वासितांशी गैरवर्तन होणार नाही याची दक्षता घ्या : जयशंकर

दरम्यान, निर्वासितांना परत पाठविताना त्यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घेण्यासंदर्भात भारत सरकार अमेरिकेच्या संपर्कात आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीय नागरिकांना अमेरिकेने बुधवारपासून परत पाठवायला सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी अमेरिकेचे लष्करी विमान शंभरावर नागरिकांना घेऊन अमृतसर विमानतळावर उतरले. त्यामुळे विरोधकांनी भारतीय नागरिकांचा अपमान झाल्याचा आरोप केला होता. त्यावर जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन केले. (Deportee handcuffed)

एखाद्या देशाचे नागरिक तेथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे आढळल्यास त्यांना परत आणणे सर्व राष्ट्रांचे कर्तव्य आहे, तथापि त्यांना परत पाठवताना त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना भारत सरकारने अमेरिकन सरकारला केली आहे, असे ते म्हणाले.

अमेरिकेत इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंटच्यावतीने निर्वासितांना परत पाठवण्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येते. २०१३ पासून हद्दपारीसंदर्भातील कार्यपद्धती अवलंबवण्यात येते. त्यात कोणत्या विमानांद्वारे हद्दपारी करायची याची मानक कार्यपद्धतीही ठरलेली आहे. अमेरिकेने ५ फेब्रुवारीलाही भारतीयांसाठी याच पद्धतीचा अवलंब केला आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. (Deportee handcuffed)

ही पद्धत चार्टर्ड नागरी विमानांना तसेच लष्करी विमानांनाही लागू आहे. मी पुन्हा सांगतो की, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकने पाठवलेल्या विमानाच्या कार्यपद्धतींत कोणताही बदल केलेला नाही. परत पाठवण्यात येणाऱ्या निर्वासितांशी उड्डाणादरम्यान कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केले जाणार नाही यासाठी आम्ही अमेरिकन सरकारच्या संपर्कात आहोत.

हेही वाचा :

:…मग गुजरातचे लोक अमेरिकेत कसे?
अमेरिकेतून शंभरावर भारतीयांची पाठवणी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00