Home » Blog » Deepika Kumari : दीपिका, पार्थला ब्राँझ

Deepika Kumari : दीपिका, पार्थला ब्राँझ

तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये रिकर्व्ह प्रकारात भारताची दोन पदके

by प्रतिनिधी
0 comments
Deepika Kumari

शांघाय : भारताच्या दीपिका कुमारी, पार्थ साळुंखे या तिरंदाजांनी तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-२च्या अखेरच्या दिवशी रिकर्व्ह प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. याबरोबरच, या स्पर्धेमध्ये भारताने मिळवलेल्या एकूण पदकांची संख्या सातवर पोहोचली. (Deepika Kumari)

रिकर्व्ह प्रकारातील वैयक्तिक महिला गटात दीपिकाला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या दक्षिण कोरियाच्या लिम सिहयोनकडून १-७ असा पराभव पत्करावा लागला. दीपिका जागतिक क्रमवारीत सध्या बाराव्या स्थानी आहे. ब्राँझपदकासाठी तिची लढत कोरियाच्याच चेयाँग कँग हिच्याशी झाली. ही लढत ७-३ अशी जिंकून दीपिकाने ब्राँझपदक निश्चित केले. या लढतीत पहिला सेट २७-२७ असा टाय झाल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये दीपिकाने २८-२७ अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये कँगने दीपिकाला ३०-२७ असे मागे टाकले. मात्र, चौथ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत ३०-२९ अशा आघाडी घेतली. निर्णायक पाचव्या सेटमध्येही २९-२८ अशी आघाडी घेत दीपिकाने ७-३ असा विजय निश्चित केला. (Deepika Kumari)

वैयक्तिक पुरुष गटात उपांत्य फेरीमध्ये क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या दक्षिण कोरियाच्या किम वूजिनने ६० व्या स्थानावरील पार्थला ६-४ असे पराभूत केले. ब्राँझपदकासाठी पार्थसमोर फ्रान्सच्या सहाव्या स्थानावरील बाप्तिस्ट ॲडीजचे आव्हान होते. हे आव्हान चुरशीच्या लढतीत ६-४ असे मोडून काढत पार्थने ब्राँझपदकावर नाव कोरले. या सामन्यात पार्थने पहिला सेट ३०-२८ असा जिंकल्यानंतर दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २८-२८, २५-२५ असा टाय झाला. चौथ्या सेटमध्ये ॲडीजने ३०-२७ अशी आघाडी घेऊन सामन्यात बरोबरी साधली. मात्र, निर्णायक सेटमध्ये पार्थने २९-२८ अशी आघाडी घेत ब्राँझपदक निश्चित केले. पुरुष सांघिक गटात मात्र ब्राँझपदकासाठी झालेल्या सामन्यात अमेरिकेने भारताला ५-३ असे पराभूत केले. भारताने या स्पर्धेत कम्पाउंड प्रकारात दोन सुवर्णांसह एकूण पाच पदके मिळवली होती. त्यामुळे, भारताने स्पर्धेत मिळवलेल्या एकूण पदकांची संख्या सात झाली. (Deepika Kumari)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00