मुंबई : विशेष प्रतिनिधी : मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात वेळेत उपचार न मिळाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (८ एप्रिल) उघडकीस आली. चंद्रकांत धोत्रे (वय ६०) असे मृताचे नाव आहे. ते सोलापूरहून आले होते.(Death in Aamdar Niwas)
त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात आल्यानंतर धावपळ उडाली. १०८ क्रमाकांवर अनेकदा फोन करण्यात आले. मात्र रुग्णवाहिका आमदार निवासस्थानी आली नाही. शेवटी त्यांना पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेत पोहोचली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. मंत्रालयापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Death in Aamdar Niwas)
चंद्रकांत पुत्र विशाल धोत्रे यांच्यासह आले होते. ते भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते. समाजाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी ते मुलासमवेत सोमवारी मुंबईला आले होते. आमदार देशमुख यांच्या नावे असलेल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानातील त्यांच्या खोली क्रमांक ४०८ मध्ये ते थांबले होते. (Death in Aamdar Niwas)
रात्री साडेबाराच्या सुमारास चंद्रकांत धोत्रे यांना छातीत दुखू लागले. पुत्र विशाल यांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली. वारंवार फोन करून कळवूनही रुग्णवाहिका अर्धा तास उलटले तरी घटनास्थळी आली नाही. त्यामुळे अखेर पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करून पोलिस व्हॅन मागवण्यात आली. ती आल्यानंतर धोत्रे यांना त्यात घालून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती.
..तर कदाचित वडील वाचले असते
वेळेत रुग्णवाहिका आली असती तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता. वारंवार फोन करूनही आमदार निवासस्थानात रुग्णवाहिका आली नाही. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी. आमदार निवासस्थानी एक रुग्णवाहिका कायमस्वरुपी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विशाल धोत्रे यांनी केली आहे.
हेही वाचा :
पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल
विनयभंग करणाऱ्या पोलिसाला कोठडी