Home » Blog » Clashes in Vidhan Bhavan lobby : विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी; आव्हाड, पडळकर समर्थक भिडले

Clashes in Vidhan Bhavan lobby : विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी; आव्हाड, पडळकर समर्थक भिडले

by प्रतिनिधी
0 comments
Clashes in Vidhan Bhavan lobby

मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत गुरुवारी (१७ जुलै) तुफान हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी धाव घेत राडा थांबवला. या घटनेने विधानभवनात तणाव निर्माण झाला. त्याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले. यावर निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि कडक कारवाई करावी, अशी भूमिका मांडली. (Clashes in Vidhan Bhavan lobby)

आमदार आव्हाड आणि आमदार पडळकर यांच्यातील वाद आता विधानभवनापर्यंत पोहोचला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोघांचेही कार्यकर्ते भिडले. याचे पडसाद विधानसभेतदेखील उमटले. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “काही गुंडांनी आपसात मारामारी केली, मला जे काही समजले त्यात गोपीचंद पडळकर यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. विधानभवनात आमदारांवर हल्ला होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.” अशी मागणी त्यांनी केली.

आमदार रोहित पवार विधानसभेत म्हणाले, “विधानभवनात आमदार हा महत्त्वाचा असतो. पण बाहेरुन आलेल्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली. कोणी हाणामारी केली? त्याचा शोध घ्यावा आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याला मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “गृहराज्य मंत्र्यांनी आमदारांनी मांडलेल्या मुद्द्याची दखल घेतली आहे. या सगळ्या घटना या विधानभवनात झाल्या आहेत. या प्रकरणाची सरकार चौकशी करेलच. पण या प्रांगणामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. माझी विनंती आहे की, आज ज्यांना पास देण्यात आले त्याचीही चौकशी झाली पाहिजे.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (Clashes in Vidhan Bhavan lobby)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “घडलेली घटना एकदम चुकीची आहे. अशाप्रकारचे इथे घटना घडने योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याअंतर्गत हा परिसर येतो. त्यामुळे अध्यक्ष आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी. यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्षांनी करावी, अशी मी विनंती केली आहे. एकतर मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे विधानसभेला शोभत नाही. त्यामुळे निश्चित कारवाई झाली पाहिजे.

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, “जर तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल तर आणि ते हल्ले करणार असतील तर आमचे जीव सुरक्षित नाहीत. मी स्वत: ट्विट केले आहे. मला आया बहिणींवरून शिवीगाळ करण्यात आली. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते. विधिमंडळाच्या आवारात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला आमदार राहायचे? आमचा काय गुन्हा आहे? कुणीतरी मवाल्यासारखा येतो आणि आमच्या आय बहिणीवरून शिव्या देतो. असंसदीय शब्द वापरले जातात. त्याला संसदीय शब्द म्हणून जाहीर करा. सत्तेचा एवढा माज आणि मुजोरपणा?” असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. (Clashes in Vidhan Bhavan lobby)

विधान परिषदेतही पडसाद

अनिल परब म्हणाले की, सभागृहात कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. पण विधीमंडळाच्या आवारात मारामारी झाली आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सभागृहाच्या खालील लॉबीत आता मारामारी सुरू आहे. हे सर्व काय चाललं आहे? मला माहित नव्हतं मारामारी होणार आहे, नाहीतर मी लिखित दिलं असतं. मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. जर सूचना दिली असती तर सभागृहात सांगितलं तरी असतं, असे म्हणत अनिल परब यांनी खिल्ली उडवली.

सभापती राम शिंदे म्हणाले, अशा काही गोष्टींसाठी भविष्यात नवीन आयुध निर्माण करण्याची गरज आहे. यावर अनिल परब म्हणाले की, पॉईंट ऑफ इन्फामॅशनच्या माध्यमातून सरकारला मारामारीवर निवेदन करायला सांगावं. सभागृहामध्ये कायदा व्यवस्थेची चर्चा सुरू आहे आणि खाली आमदार मारामारी करत आहेत. अनिल परब यांच्या मागणीवर राम शिंदे यांनी शासनाच्या वतीने मंत्र्यांना माहिती देण्यास सांगितले. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती घेऊन सभागृहात उपस्थित करतो, असे उत्तर दिले. (Clashes in Vidhan Bhavan lobby)

दोन दिवस धुमसतोय वाद

जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळ परिसरात गोपीचंद पडळकर यांना पाहून ‘मंगळसूत्र चोराचा…’ अशी घोषणाबाजी काही दिवसापूर्वी केली होती. त्यामुळे पडळकर संतापले होते. बुधवारी विधानभवनाच्या गेटवर दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला आहे. जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळ गेटवरून पायी जात होते. त्यावेळी पडळकर यांची कार थेट आव्हाड यांच्या दिशेने आली. यावेळी कारचा दरवाजा आपल्याला लागला म्हणत आव्हाड यांनी पडळकरांना जाब विचारला आणि दोन्ही नेत्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘मी एकटाच आहे. कधीही ये… तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन मी फिरत नाही,’ असे पडळकर म्हणाले. त्यावर आव्हाड यांनीही तशाच शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘मी आयुष्यभर मुंबईत राहिलो. धमकी कुणाला देतो.’ या घटनेनंतर आव्हाड आणि पडळकर यांचे समर्थक गुरुवारी विधानसभेच्या आवारात आले होते. त्यातून दोन्ही गटांमध्ये राडा झाला. (Clashes in Vidhan Bhavan lobby)

 

सखोल अहवाला मागविला : अध्यक्ष नार्वेकर

 ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण व गंभीर असून याबाबत आपण सुरक्षा विभागाकडून सखोल अहवाल मागितला आहे. तो आल्यानंतर आपण योग्य ती कारवाई करू, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. 

तातडीने कारवाई करावी : उद्धव ठाकरे

 विधानभवनात हाणामारी करणारे समर्थक आहेत की गुंड आहेत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ही परिस्थिती राज्यात आली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यानं पास दिले असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.  हा अधिकार अध्यक्षांचा असतो, त्यांची दिशाभूल केली गेली का असा सवाल आहे. अशी गुंडगिरी विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर अवघड आहे. गृहमंत्र्यांनी या गुंडांवर आणि गुंडांच्या पोशिंद्यांवर कारवाई केली पाहिजे, तरच तुम्ही राज्याचे तरच पालक, मुख्यमंत्री म्हणण्यास पात्र आहात असे ते म्हणाले.

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

विधानभवनाच्या लॉबीत जो प्रकार घडला त्याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत घडलेल्या घटनेबाबत तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेत तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.    

 

 पडळकर यांच्याकडून दिलगिरी 

विधानसभेच्या प्रांगणात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याचं अतीव दु:ख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती हा आवार त्यांच्या कक्षेत असल्यानं दिलगिरी व्यक्त करतो.  याविषयी आमच्या नेतेमंडळींशी चर्चा करुन तुमच्या सगळ्यांशी बोलतो, असे पडळकर यांनी सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00