मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात ‘हनी ट्रॅप’च्या मुद्द्यावरून खळबळ उडाली असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी आणखी एक गौप्यस्फोट केला. ‘हनी ट्रॅम्प’मध्ये अडकवून ‘मविआ’ सरकार पाडण्यात आले. आमचे १५-१६ आमदार व ४ तरुण खासदार फोडण्यात आले, आताच्या राज्य सरकारमधील ४ मंत्री त्यामध्ये अडकले असून त्यापैकी २ भाजपाचे आहेत, असा सणसनाटी आरोप त्यांनी केला. (Raut slams BJP)
मंत्री गिरीश महाजन व प्रफुल्ल लोढा यांचा फोटो ‘एक्स’वर पोस्ट करीत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून झाल्यास अनेक बाबी चव्हाट्यावर येतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात ‘हनी ट्रॅप’चे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा दावाही केला आहे. (Raut slams BJP)
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्रात ‘हनी ट्रॅप’ नाही असे सांगितले, पण त्यांची ही माहिती दिशाभूल करणारी असे सांगून ते म्हणाले,” भाजपाने विरोधी आमदार फोडण्यासाठी ईडी, सीबीआय प्रमाणेच हनी ट्रॅपचा वापर लोढाच्या माध्यमातून केला होता, त्यामुळे या फोटोची सीबीआयकडून चौकशी झाल्यास ‘दूध का दूध पानी का पानी होईल!” या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात चार मंत्री आणि अनेक अधिकारी अडकले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतात. (Raut slams BJP)
ते म्हणाले, पोलिसांनी अटक केलेल्या लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला असून पोलिसांची पथके आज लोढा यांच्या अनेक ठिकाणांवर छापा मारत आहे. त्यांना चार पेन ड्राइव्ह शोधायचे आहे. दोन सीडी आहेत. त्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे. त्यात जे आहे, ते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत असल्याचा दावा करून ते म्हणाले, ‘हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी झाली आहे. या ट्रॅपमुळे १६ ते १७ आमदार आणि चार खासदार भाजपने आपल्याकडे वळवले. त्यांना सीडी दाखवली जात होती. ईडी, सीबीआय हा प्रकार वेगळा आहे. प्रफुल्ल लोढा हा व्यक्ती या हनी ट्रॅप मागे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लोढा यांचा फोटो आहे. त्या फोटोची चौकशी करा, या प्रकारामध्ये तक्रारदार शक्यतो नसतो. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते. आता ते स्वतःच ब्लॅकमेल होत आहेत. या प्रकरणाची सूत्रे जामनेर, जळगाव, नाशिक, ठाणे आणि दिल्ली येथून हलविण्यात आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार असून ‘सामना’तील मंगळवारच्या अग्रलेखातून अनेक बाबी स्पष्ट होतील, असा दावाही केला आहे,
काय आहे प्रकरण?
कथित हनीट्रॅप प्रकरणामध्ये ७२ पेक्षा जास्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आयएएस, आयपीएस अधिकारी, आणि काही माजी व विद्यमान मंत्री यांना अडकवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुरुवात नाशिक येथून झाली, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कथित संवेदनशील व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले, ज्यामध्ये तिने काही वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांच्या संशयास्पद कृतींचे व्हिडिओ असल्याचे सांगितले. ठाणे क्राइम ब्रांचला तीन तक्रारी मिळाल्या असून, त्याची गोपनीय चौकशी सुरू आहे. एका महिलेवर आरोप आहे की, तिने उच्चपदस्थ अधिकारी आणि नेत्यांना ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळले. याबाबत काँग्रेसचे आ.नाना पटोले यांनी विधानसभेत एक पेन ड्राइव्ह दाखवून यामध्ये ७२ आयएएस अधिकारी आणि माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचा दावा केला.
नुसते आरोप नको पुरावे द्या : मुख्यमंत्री
संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप केले असून त्याला महत्व देत नाही, हिंमत असेल तर त्यांनी या संदर्भात पुरावे द्यावेत, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते म्हणाले,’ राऊत यांनी ज्या व्यक्तीचे फोटो दाखवले आहेत, त्याचे सर्व पक्षाच्या नेत्यांसमवेत फोटो आहेत. शरद पवारासमवेत आहेत. त्यामुळे त्यांच्या असल्या आरोपांना काही अर्थ नाही, मी जेव्हा विरोधी पक्षात होतो, तेव्हा पुराव्यानिशी आरोप करत होतो, त्यामुळे आम्हाला एकाही बाबतीत माघार घ्यावी लागली नाही, असेही त्यांनी सांगितले.