Home » Blog » Police abuse BC girls : पोलिसांकडून मागासवर्गीय मुलींना जातीवाचक शिविगाळ, मारहाण

Police abuse BC girls : पोलिसांकडून मागासवर्गीय मुलींना जातीवाचक शिविगाळ, मारहाण

by प्रतिनिधी
0 comments
Police abuse BC girls

पुणे : छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या तीन मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आली. यात सहभागी संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात ठिय्या मारला. (Police abuse BC girls)

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संबंधित पोलिसांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही आणि तसे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही, असा इशारा दिला. (Police abuse BC girls)

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार हेही उपस्थित होते. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती आमदार पवार यांनी घेतली.

मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, याबाबत सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याशीही चर्चा केली, असे आमदार पवार यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Police abuse BC girls)

यावेळी प्रशांतदादा जगताप, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मूळ प्रकरण काय?

संबंधित पीडिता छत्रपती संभाजीनगर येथील आहे. तिने घर सोडले आणि पुण्यात आली. तिच्याजवळ कुठली ओळख नव्हती, ना कुठलाही आधार. पण तिच्या वेदनेची जाणीव झाली तीन महिलांना. त्यांनी तिला एका रात्रीसाठी आपल्याकडे थांबायला जागा दिली. माणुसकीपोटी या पीडितेला आसरा देणाऱ्या या महिलांनाच गुन्हेगार ठरवण्यात आले.

पीडित स्त्रीचा सासरा माजी पोलीस अधिकारी आहे. त्याने आपली पोलीसखात्यातली ओळख वापरली. काही अधिकारी, काही सत्ताधाऱ्यांच्या मदतीने ही पीडिता थांबलेल्या घरी छापे मारण्यात आले. तेही कोणत्याही नोटीसशिवाय, कोणत्याही वॉरंटशिवाय, असा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे.

त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या घरात अचानक रात्री पोलिस घुसले. या मुलींचे कपडे उचकटले, मोबाईल तपासले. अंगझडतीही घेण्यात आली. कोणताही गुन्हा नसताना त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. एका मुलीला तिच्या नोकरीच्या ठिकाणावरून पोलीस गाडीत ओढून नेले. या तिघींना जातिवाचक शिविगाळही करण्यात आली, असे आरोप यावेळी करण्यात आले आहेत.

पोलिसांनी आरोप फेटाळले
दरम्यान, पोलिसांनी जातिवाचक शिविगाळ केली. तसेच लैंगिक अवमानकारक शेरेबाजी केल्याचा गंभीर आरोप याप्रकरणातील तीन मुलींनी केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक कामठे यांनी एका मुलीच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00