कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेतील ८२ लाखाच्या ड्रेनेज घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेला दुचाकी आणि रिक्षांनी घेराव घालण्यात आला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. शिवसेनेच्यावतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देण्यात आले. (KMC drainage scam)
रविकिरण इंगवले यावेळी म्हणाले, महापालिकेत भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरु झाली आहे. कोण जास्त भ्रष्टाचार करेल त्याला जास्त पारितोषिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. मनपामधील अधिकारी वर्ग भ्रष्ट झाला असून यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक नकोत. ८५ लाखांचा घोटाळा हा कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं केल्याचा आरोप त्यांनी केला. फिर्यादीला आरोपी केले आहे, असा आरोप करुन इंगवले यांनी बावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यात कोल्हापूर मनपा आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. जर कारवाई होत नसेल, तर चुकीचं असल्याचे ते म्हणाले. आंदोलनात माजी नगरसेवक सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तरे, महेश उत्तुरे, शशी बिडकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. (KMC drainage scam)
दरम्यान, बावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली. या चौकशी समितीला ४८ तासात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. या समितीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला. तथापि, मनपा प्रशासकांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर अजून कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात या घोटाळ्याच्या विरोधात महानगरपालिकेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच आरोपी असल्याने महानगरपालिकेकडून फिर्यादीचे नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. (KMC drainage scam)