म्युनिच : भारताची नेमबाज एलावेनिल वलारिवनने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मी. एअर रायफल प्रकारामध्ये महिला गटात ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. (Elavenil)
जर्मनीमधील म्युनिचमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. १० मी. एअर रायफलच्या प्राथमिक फेरीत एलावेनिल ६३५.९ गुणांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर राहिली. चीनच्या झिफेई वांगने ६३७.९ गुणांसह प्राथमिक फेरीत अग्रस्थान पटकावले, तर नॉर्वेची जेनेट हेग ड्युस्टाड ६३५.७ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. भारताकडून एकट्या एलावेनिललाच अंतिम फेरी गाठण्यात यश आले. प्राथमिक फेरीत भारताची रमिता तेराव्या, तर अनन्या नायडू पंधराव्या स्थानी राहिल्याने अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. (Elavenil)
अंतिम फेरीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एलावेनिलने १०५.८ गुण मिळवले. त्यानंतरच्या एलिमिनेशन टप्प्यामध्ये सहा राउंडअखेर एलावेनिल २३१.२ गुणांवर राहिल्याने रौप्य व सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. झिफेईने अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत २५२.७ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. दक्षिण कोरियाच्या युन्जी क्वोनने २५२.६ गुणांसह रौप्यपदक जिंकले. (Elavenil)
दरम्यान, या स्पर्धेमध्ये १० मी. एअर पिस्टल प्रकारामध्ये पुरुष गटात भारताचा सरबज्योत सिंग प्राथमिक फेरीमध्ये दुसऱ्या राउंडअखेर पाचव्या स्थानी आहे. त्याच्या खात्यात १६८ गुण असून अद्याप प्राथमिक फेरीचे चार राउंड बाकी आहेत. महिलांच्या २५ मी. पिस्टल प्रकारात भारताची एशा सिंह प्रिसिजन राउंडअखेर २९४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
हेही वाचा :
निकोलास पूरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
ऋतुराज यॉर्कशायरकडून खेळणार