तामिळ कवी आणि गीतकार वैरामुथु यांना २०२५ सालासाठीचा ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा १४ मार्च रोजी करण्यात आली. एखाद्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे हा त्या भाषेचा गौरव मानला जातो. परंतु वैरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तमिळनाडूमध्ये निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. त्यांचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.
तामिळ साहित्यातील मोठ्या योगदानासाठी वैरामुथू यांना ज्ञानपीठ सन्मान देण्यात येत असल्याचे भारतीय ज्ञानपीठातर्फे जाहीर करण्यात आले. गेल्या २० वर्षांत ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे तामिळ साहित्यिक ठरले आहेत. यापूर्वी हा पुरस्कार १९७५ मध्ये अकिलन आणि २००२ मध्ये जयकांतन यांना मिळाला होता.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन अशा मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. (Jnanpith Award embroiled in controversy)
मी टू आंदोलनाचे सावट
मात्र या पुरस्काराच्या घोषणेनंतर तामिळनाडूमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक लेखक, कलाकार, स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरील ‘मी टू’ आंदोलनाशी संबंधित जुन्या आरोपांची आठवण करून देत पुरस्काराला विरोध केला आहे. साहित्यिक सन्मान देताना नैतिकता आणि महिलांचा सन्मान दुर्लक्षित करता कामा नये, असे विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे.
२०१८ मध्ये भारतात ‘मी टू’ आंदोलन सुरू झाले तेव्हा वैरामुथु यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. पार्श्वगायिका चिन्मयी श्रीपदा यांनी सर्वप्रथम जाहीर आरोप केले. २००० ते २००६ या काळात वैरामुथु यांनी आपल्याशी अयोग्य पद्धतीने संपर्क साधला, हॉटेलमध्ये बोलावले आणि करिअर बिघडवण्याची धमकी दिली, असे त्यांनी म्हटले होते. गायिका भुवना शेषन यांच्यासह सुमारे वीस महिलांनी त्यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. मात्र वैरामुथु यांनी हे सर्व आरोप नाकारले होते. (Jnanpith Award embroiled in controversy)
रजनीकांत, कमल हासनवरही टीका
रजनीकांत आणि कमल हासन यांनी केलेल्या अभिनंदनाबद्दल चिन्मयी श्रीप्रदा यांनी म्हटले आहे की, “शक्तिशाली पुरुष नेहमी एकमेकांना साथ देतात, महिलांच्या वेदनेची त्यांना पर्वा नसते.”आज ज्ञानपीठ पुरस्काराची प्रतिष्ठा कमी झाली असल्याचे पत्रकार एस.ललिता यांनी म्हटले आहे. ज्ञानपीठ निवड समितीला मीटू प्रकरणाची माहिती नाही किंवा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे लेखक अनंत नारायण यांनी म्हटले आहे.
यापूर्वी २०२१ मध्ये केरळमधील ओएनव्ही अकॅडमीने वैरामुथू त्यांना ONV पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. मात्र व्यापक विरोधानंतर वैरामुथू यांनीच हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते. आता देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार वैरामुथू यांच्यानिमित्ताने वादात सापडला आहे. (Jnanpith Award embroiled in controversy)