मुंबई : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम उभारणी करण्यासाठी १२ हेक्टर ७६ आर इतकी शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागास भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त (विनामूल्य) तसेच कब्जेहक्काने ही जमीन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून युवकांना दर्जेदार क्रीडासुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या संदर्भात तीन सप्टेंबर २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी विकासवाडी येथील एमआयडीसी च्या ताब्यातील ३० एकर जमीन केडीसीए कडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयास अनुसरून, आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली असून, कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग आता अधिकृतपणे मोकळा झाला आहे. (Land transfer for Kolhapur International Cricket Stadium)
ही जमीन शालेय शिक्षण व क्रीडा विभागास प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या नियम, तरतुदी व धोरणांचा विचार करून जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर यांना आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून देण्यासाठी कराराची कार्यवाही करण्यात येणार आहे. या जमिनीचा वापर केवळ मंजूर कारणासाठीच करणे बंधनकारक राहील. या जागेवर क्रीडांगण अथवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत कोणताही निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.
संभाजीराजे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला असून, करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या जमिनीपैकी ३० एकर जमीन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक होतकरू क्रिकेटपटूंना याचा मोठा लाभ होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत. (Land transfer for Kolhapur International Cricket Stadium)
तसेच, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार, मंत्रालयातील महसूल, अर्थ, उद्योग व क्रीडा विभागांचे सचिव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व क्रीडा विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, केडीसीएचे पदाधिकारी बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, विकासवाडीचे ग्रामस्थ आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही त्यांनी विशेष आभार मानले आहेत. (Land transfer for Kolhapur International Cricket Stadium)