नवी दिल्लीः
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पारंपरिक हलवा समारंभात भाग घेतला. त्यावरुन गेल्यावर्षी राहुल गांधी यांनी हलवा समारंभावरून केलेल्या उपहासात्मक टीकेची आठवण झाली.(Budget Halwa)
काय असतो हा हलवा समारंभ आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी पारंपरिक हलवा समारंभात सहभाग घेतला. यासोबत आर्थिक वर्ष 2025-26 च्या अंदाजपत्रक दस्तऐवजांना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू झाले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी हलवा समारंभात सहभाग घेतला, अंदाजपत्रक छपाई केली जाते, त्या प्रिंटिंग प्रेसला भेट दिली. संबंधित अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थ सचिव तुहिन कांत पांडेय यांच्यासह आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी या समारंभाला उपस्थित होते.(Budget Halwa)
हलवा समारंभ हा अंदाजपत्रकाच्या अंतिम तयारीचा शेवटचा टप्पा मानला जातो. हा दरवर्षी होणारा समारंभ आहे. ज्यामध्ये हलवा तयार केला जातो. अर्थ मंत्रालयाच्या बजेट तयारीत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप केले जाते.
हलवा समारंभ कधीपासून (Budget Halwa)
हलवा समारंभ कधी सुरू झाला याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु १९५० नंतर याचे महत्त्व वाढले. त्यावेळी अंदाजपत्रकाची माहिती फुटली होती. त्यानंतर गोपनीयता राखण्यावर विशेष भर दिला जाऊ लागला. आता अंदाजपत्रक दस्तावेजांची छपाई वित्त मंत्रालयाच्या अत्यंत सुरक्षित तळघरात केली जाते. हा समारंभ दिल्लीत नॉर्थ ब्लॉकच्या ‘बेसमेंट’मध्ये आयोजित केला जातो. येथेच प्रिंटिंग प्रेस आहे.
वैशिष्ट्य काय?
खरं तर, ‘हलवा’ समारंभ हा केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाच्या तयारीत सहभागी असलेल्या वित्त मंत्रालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वेगळे ठेवण्याची’ प्रक्रिया आहे. म्हणजेच, ते बाहेरील जगापासून पूर्णपणे अलग ठेवले जातात. जसे दूरचित्रवाणीवरील बिग बॉस कार्यक्रमात सहभागी कलावंतांना जगापासून वेगळे ठेवले जाते. त्याचपद्धतीने या अधिकारी कर्मचा-यांना वेगळे ठेवले जाते. त्यांना मोबाइल किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नसते. बाहेरच्या जगाशी त्यांचा कोणताही संबंध नसतो.
हे अधिकारी आणि कर्मचारी संसदेत अंदाजपत्रक सादर होईपर्यंत नॉर्थ ब्लॉकच्या ‘बेसमेंट’मध्येच राहतात, जिथे संपूर्ण गोपनीयता पाळली जाते. अर्थमंत्री लोकसभेत आपले अंदाजपत्रक भाषण पूर्ण केल्यानंतरच ते बाहेर येतात.
राहुल गांधींचा प्रश्न
गतवर्षी २९ जुलै २०२४ रोजी राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हलवा समारंभावर प्रश्न उपस्थित केला होता. हिंदुस्तानचे हलवा वाटप फक्त २० लोकांनी केले आहे. या २० अधिकाऱ्यांनी देशाचे अंदाजपत्रक तयार केले. यामध्ये फक्त एकच अल्पसंख्यांक आणि एका ओबीसी अधिका-याचा समावेश आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले होते.
लोकसभेत राहुल गांधी यांनी हलवा समारंभाच्या फोटोचे पोस्टर दाखवले. ‘या फोटोमध्ये अंदाजपत्रकाचा हलवा वाटला जात आहे. मला यात एकही ओबीसी, आदिवासी किंवा दलित अधिकारी दिसत नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. या प्रक्रियेत जो एक अल्पसंख्य आणि ओबीसी अधिकारी होते, ते फोटोत नाहीत. फोटोतही त्यांना मागे ढकलले आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचाः
patanjali chilli powder : ‘पतंजली’च्या मिरची पूडमध्ये…
ST Bus एसटी भाडेवाडीचा दणका
ranas extradition : तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण