कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल ४०९ दिवसांनी ११६० किलोमीटरचा प्रवास करुन गुजरातमधील वनतारा येथून माधुरी हत्तीण मुळ नांदणी (ता.शिरोळ) गावी परतली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थित फटाक्याची आतषबाजी आणि फुलांच्या उधळणीत माधुरीचे जंगी स्वागत करण्यात आले. बऱ्याच दिवसांनी माधुरी परतल्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. (Arrival of Madhuri the elephant in Nandni)
माधुरीला परत आणण्यासाठी शेट्टींची पदयात्रा
सव्वा वर्षापूर्वी प्राणी मित्र संघटना ‘पेटा’ ने केलेल्या तक्रारीनंतर माधुरीची हत्तीणीची देखभाल नांदणीच्या जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाकडून होत नसल्याने तिची रवानगी अंबानी उद्योग समुहाच्या वनतारामध्ये झाली होती. माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन उभारण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा काढण्यात आली. अखेर जनमताचा आग्रह, नांदणी मठाने माधुरीसाठी केलेल्या सोयीसुविधेनंतर माधुरीला परत नांदणीत पाठवण्यात आले. (Arrival of Madhuri the elephant in Nandni)
माधुरीच्या स्वागतासाठी नांदणीकर एकवटले
गुरुवारी सायंकाळी वनतारातून माधुरीचा नांदणीकडे प्रवास सुरू झाला. तिच्यासोबत वनतारा पुनर्वसन केंद्रातील ४२ कर्मचारी होते. चार माहूत आणि वैद्यकीय पथक त्यांच्यासोबत होते. बडोदा, सुरत, वापी, ठाणे, पुणे, सातारा, कराड, किणी टोलनाका मार्गे रात्री साडेबाराच्यासुमारास माधुरी नांदणीच्या गावाच्या हद्दीच्या बाहेर पोहोचली. माधुरीच्या स्वागतासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजुने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिच्या स्वागत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला केळीचे घड, सफरचंद, पपई, संत्री, कलिंगड, ऊस, चाऱ्याची आरास केली केली होती. नांदणी मठाचे धर्मसेन भट्टारक महास्वामी आणि कोल्हापूरातील जैन मठातील लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीने तिचे स्वागत केले. यावेळी मोठी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. लोकांनी तिच्यावर फुलांची उधळण केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर माधुरीला सर्वसोयीनीयुक्त नवीन निवासस्थानात आणण्यात आले. (Arrival of Madhuri the elephant in Nandni)