जमीर काझी : मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर पक्षाचा महापौर बसविण्याचे भाजपाचे स्वप्न अखेर ४४ वर्षानंतर साकारले. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे व उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या संजय घाडी यांची बुधवारी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदासाठी त्यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या नियुक्तीमुळे अखेर सुमारे चार वर्षांचे प्रशासक’राज’ संपुष्टात आले आहे.
त्यांच्या नियुक्तीवेळी मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे मुंबईतील प्रमुख नेते व पदाधिकारी सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित होते. महापालिकेच्या परिसरात भाजपाकडून बॅनर व पोस्टर लावून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (BJP Mayor in Mumbai after four and a half decades)
पीठासन अधिकारी नियमबदलावर उबाठाचा आक्षेप
महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया यावेळी नव्या नियमांनुसार पार पडली. नव्या अधिसूचनेनुसार, महापालिका आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी म्हणून विराजमान झाले. यापूर्वीच्या नियमानुसार मावळते महापौर किंवा सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक निवड प्रक्रियेचे अध्यक्षस्थान भूषवत असत. मात्र, सभागृहाचा कार्यकाळ संपून जवळपास तीन वर्षे झाल्याने “मावळते महापौर” ही संकल्पना लागू होत नव्हती. जुन्या नियमानुसार शिवसेना (उबाठा) पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी होण्याचा अधिकार होता; मात्र तो अधिकार काढून थेट प्रधान सचिव दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला देण्यात आला. भूषण गगराणी यांचा दर्जा प्रधान सचिवाचा असल्याने त्यांनीच निवड प्रक्रिया पार पाडली. या नियमबदलावरून शिवसेना (उबाठा) पक्षाने आक्षेप घेतला असून सत्ताधारी-विरोधकांतील संभाव्य तिढा टाळण्यासाठीच हा बदल करण्यात आल्याची राजकीय चर्चा रंगली होती. तर मुंबईतील हवेच्या वाढत्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तोंडाला मास्क लावून सभागृहात प्रवेश केला.त्यांना बसण्यासाठी आसन न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. (BJP Mayor in Mumbai after four and a half decades)
भाजपा- ठाकरेंच्या नगरसेवकात जोरदार घोषणाबाजी
महापौर-उपमहापौर नियुक्तीदरम्यान मुंबई महानगरपालिका मुख्यालयात वातावरण तापले होते. भाजपा व शिंदे गटाच्या नूतन नगरसेवकांनी भगवे फेटे व महिला नगरसेवकांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होताच त्यांनी वंदेमातरम आणि “देवाभाऊ”, मोदी, मोदी अशा घोषणा सुरु केल्या. त्याल्या, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून “चोर है, चोर है” असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला स्पष्ट बहुमत असल्यामुळं प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे सांगितले. निवड लोकशाही पद्धतीने आणि नियमांनुसार झाली असून स्थिर प्रशासन व विकासकामांना गती देणं हा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महायुतीला मिळालेला जनाधार या निवडीत दिसून आल्याचं सांगत सत्तावाटप पूर्ण समन्वयानं झाल्याचं नमूद केले. (BJP Mayor in Mumbai after four and a half decades)