नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी महिला क्रिकेटपटूंसोबतचे केंद्रीय वार्षिक करार जाहीर केले. याअंतर्गत सोळा खेळाडूंना विभागणी तीन श्रेणींमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे. मागील जवळपास सहा महिने भारतीय संघाबाहेर असणारी सलामी फलंदाज शफाली वर्मा हिला ब श्रेणीमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. (BCCI Contracts)
यापूर्वी, एप्रिल २०२३ मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसोबतचे करार जाहीर केले होते, तर २०२३-२४ या वर्षातील करार जाहीर करण्यात आले नव्हते. सध्या जाहीर करण्यात आलेल्या करारांचा कालावधी ऑक्टोबर, २०२४ ते सप्टेंबर, २०२५ असा आहे. कराराच्या ए श्रेणीमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा या तीनच खेळाडू आहेत. या श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांना करारबद्ध करण्यात आले आहे. बी श्रेणीमध्ये शफालीसह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष या चारजणींचा समावेश असून त्यांच्याशी प्रत्येकी ३० लाखांचा करार होईल. (BCCI Contracts)
सी श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येकी दहा लाखांचा करार मिळेल. यामध्ये एकूण सात खेळाडू आहेत. श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी, तितास साधू, अमनज्योत कौर आणि उमा छेत्री या २०२३च्या करारयादीत नसणाऱ्या खेळाडूंशी नव्याने करार करण्यात येईल. त्याचवेळी हरलीन देओल आणि प्रतिका रावल या खेळाडूंना करारयादीतून वगळण्यात आले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर हरलीनने यावर्षी जानेवारी महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करत वन-डे कारकिर्दीमधील पहिलेवहिले शतक झळकावले होते. प्रतिकाने पदार्पणापासून खेळलेल्या सहा वन-डे सामन्यांत ४४४ धावा केल्या असून हा पहिल्या सहा सामन्यांतील सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंह, देविका वैद्य या खेळाडूही करारयादीबाहेर राहिल्या आहेत. (BCCI Contracts)
भारतीय महिला संघ एप्रिल महिन्यात श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिका खेळणार असून जून महिन्यात संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात भारतामध्ये महिला वन-डे वर्ल्ड कप रंगणार आहे.
- करारबद्ध खेळाडू
- ग्रेड ए – हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा.
- ग्रेड बी – रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, शफाली वर्मा.
- ग्रेड सी – यास्तिका भाटिया, राधा यादव, श्रेयांका पाटील, तितास साधू, अरुंधती रेड्डी, अमनज्योत कौर, उमा छेत्री, स्नेह राणा, पूजा वस्त्रकर.
हेही वाचा :
तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका