दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी महिला फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माही महिला वन-डे अष्टपैलूंच्या क्रमवारीत आघाडीच्या पाच खेळाडूंमध्ये पोहोचली आहे. (Smriti Ranking)
मागील क्रमवारीत स्मृती तिसऱ्या स्थानी होती. तथापि, श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या तिरंगी वन-डे मालिकेतील कामगिरीचा फायदा तिला क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी झाला. या मालिकेत तिने पाच सामन्यांत प्रत्येकी एका शतक व अर्धशतकासह ५२.८० च्या सरासरीने २६४ धावा केल्या. अंतिम सामन्यात तिने ११६ धावा फटकावत भारताच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला होता. या कामगिरीमुळे तिचे स्थान एकने उंचावले असून नव्या क्रमवारीत ती ७२७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉल्वार्ट ही ७३८ गुणांसह अव्वलस्थानी आहे. स्मृतीशिवाय भारताच्या एकाही महिला फलंदाजास या क्रमवारीतील पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळवता आलेले नाही. स्मृतीखालोखाल भारताची जेमिमा रॉड्रिग्ज ६०६ गुणांसह पंधराव्या स्थानावर असून तिचे स्थानही आधीच्या क्रमवारीच्या तुलनेत पाचने उंचावले आहे. जेमिमानेही तिरंगी मालिकेत एका शतकासह २४५ धावा फटकावल्या होत्या. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ६०५ गुणांसह सोळाव्या स्थानावर आहे. (Smriti Ranking)
अष्टपैलूंच्या क्रमवारीत दीप्तीचे स्थान एकने उंचावले असून ती पाचव्या स्थानी पोहोचली. तिच्या खात्यात ३५३ गुण आहेत. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची ॲश गार्डनर ४७० गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तिरंगी मालिकेत दीप्तीने एका अर्धशतकासह १४६ धावा करण्याबरोबरच ५ विकेटही घेतल्या. सांघिक वन-डे क्रमवारीत भारत ११३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ १६८ गुणांसह पहिल्या, तर इंग्लंड १२४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Smriti Ranking)
हेही वाचा :
विराट कोहली कसोटीमधून निवृत्त