नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये दोन्ही संघांदरम्यान तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येतील. २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यामध्ये फक्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणार आहे. (Bangladesh Tour)
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी या दौऱ्याविषयी माहिती दिली. या वर्षी सप्टेंबर महिन्यात आशिया कप टी-२० स्पर्धा रंगणार असून भारताचा बांगलादेश दौरा हा या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा अखेरचा टप्पा असेल. ढाकामधील शेर-ए-बांगला स्टेडियम आणि चितगांवमधील मोतीउर रेहमान स्टेडियम येथे या मालिकेतील सामने रंगतील. “भारताविरुद्धच्या मालिका या बांगलादेशच्या मायदेशातील क्रिकेट मोसमामधील सर्वांत उत्सुकता असणाऱ्या मालिका आहेत,” असे चौधरी म्हणाले. भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे मापदंड निर्माण केले आहेत. दोन्ही देशांमध्ये कट्टर क्रिकेटचाहते आहेत. यापूर्वी या दोन्ही संघांमध्ये काही अतिशय चुरशीचे क्रिकेट खेळले गेले आहे. त्यामुळे, आगामी मालिकाही तितकीच अटीतटीची होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Bangladesh Tour)
या मालिकेसाठी भारतीय संघाचे १३ ऑगस्ट रोजी ढाक्यामध्ये आगमन होणार आहे. १७ आणि २० ऑगस्ट रोजी भारत-बांगलादेश यांच्यामध्ये ढाका येथे पहिले दोन वन-डे सामने रंगतील. त्यानंतर चितगांव येथे २३ ऑगस्टला तिसरी वन-डे होणार असून याच ठिकाणी २६ ऑगस्टला पहिला टी-२० सामनाही खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर, दोन्ही संघ पुन्हा ढाक्यामध्ये परतणार असून २९ व ३१ ऑगस्ट रोजी ढाक्यात टी-२० मालिकेतील अखेरचे दोन सामने खेळवले जातील. ऑगस्ट महिन्यात बांगलादेशमध्ये मॉन्सून सक्रिय असल्यामुळे या दौऱ्यावर पावसाचे सावटही असणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी, डिसेंबर, २०२२ मध्ये बांगलादेशचा दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध ३ सामन्यांची वन-डे मालिका, तर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळला होता. यांपैकी वन-डे मालिका बांगलादेशने २-१ अशी जिंकली होती, तर कसोटी मालिकेत भारताने २-० असा एकतर्फी विजय मिळवला होता. (Bangladesh Tour)
हेही वाचा :
‘पंजाब किंग्ज’ला धक्का
: ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रेला संधी