Home » Blog » Ayush Mhatre : ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रेला संधी

Ayush Mhatre : ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रेला संधी

चेन्नई संघामध्ये मुंबईच्या १७ वर्षीय सलामीवीराची निवड

by प्रतिनिधी
0 comments
Ayush Mhatre

चेन्नई : दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेलेला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी १७ वर्षीय आयुष म्हात्रेला करारबद्ध करण्यात आले आहे. आयुष हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळत असून रणजी करंडक स्पर्धेच्या मागील मोसमात त्याने चमकदार कामगिरी केली होती. (Ayush Mhatre)

यंदाच्या आयपीएलमध्ये ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यादरम्यान ऋतुराजच्या कोपरास दुखापत झाली होती. त्यानंतरही ऋतुराज चेन्नईकडून दोन सामने खेळला. परंतु, एमआरआय चाचणीत त्याच्या कोपरास फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला उर्वरित आयपीएलमध्ये खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी, चेन्नईने कर्णधारपदाची धुरा पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे सोपवली असली, तरी ऋतुराजच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली नव्हती. आता चेन्नईने याकरिता आयुषची निवड केली आहे. आयुष हा नोव्हेंबर, २०२४ मध्ये झालेल्या आयपीएल लिलावादरम्यान कराराविना राहिला होता. त्याची मूळ किंमत ३० लाख इतकी होती. पुढील दोन दिवसांत आयुष चेन्नईच्या संघासोबत सहभागी होणार आहे. (Ayush Mhatre)

आयुषने मागील वर्षीच प्रथमश्रेणी आणि लिस्ट ए स्पर्धांमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या नावावर ९ प्रथमश्रेणी सामन्यांत ५०४ धावा जमा असून त्यांमध्ये २ शतके व एका अर्धशतकाचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ७ सामन्यांत २ शतके व एका अर्धशतकासह ४५८ धावा केल्या आहेत. मागील विजय हजारे स्पर्धेमध्ये त्याने नागालँडविरुद्ध १८१, तर सौराष्ट्राविरुद्ध १४८ धावांची खेळी केली होती. १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेमध्येही तो भारतीय युवा संघाकडून खेळला होता. आयपीएलच्या या मोसमामध्ये चेन्नईचा संघाला आतापर्यंत केवळ एक सामना जिंकता आला असून पाच पराभव स्वीकारावे लागले आहेत. गुणतक्त्यात चेन्नईचा संघ २ गुणांसह दहाव्या स्थानी आहे. (Ayush Mhatre)

हेही वाचा :  
बेंगळुरू पुन्हा विजयपथावर  

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00