डेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमस्खलनाची भयंकर घटना घडली आहे. रस्तेकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. यात माना गावातील ५७ कामगार अडकले होते. त्यांपैकी ३२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. जोरदार बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे या ठिकाणी हेलिकॉप्टरची मदतही घेता येत नाही, अशी स्थिती आहे. (Avalanche struck Chamoli)
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन(बीआरओ)ने दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी ५७ कामगार काम करीत होते. उर्वरित २५ कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न गढवाल ९वी ब्रिगेड आणि बीआरओच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३२ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. प्रचंड बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे मदतकार्यात कमालीचे अडथळे आले. या परिस्थितीतही राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह एनडीआरएफ आणि गढवाल ९ ब्रिगेडच्या जवानांनी कामगारांच्या सुटेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
घटनास्थळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), जिल्हा प्रशासन आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) यांची पथके अद्यापही कार्यरत आहेत. (Avalanche struck Chamoli)
जोशीमठ येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथकही पाठवण्यात आली आहे, तर दुसरे एक पथक डेहराडूनमध्ये सज्ज ठेवण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास सर्व कामगारांना एअरलिफ्ट करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली. ‘चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ सुरू असलेल्या बांधकामादरम्यान हिमस्खलनामुळे अनेक कामगार बर्फाखाली गाडले गेल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. आयटीबीपी आणि बीआरओच्या माध्यमातून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. कामगारांची सुरक्षित व्हावी, अशी प्रार्थना.” (Avalanche struck Chamoli)
चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी घटनेची माहिती देताना सांगितले, ‘हिमस्खलनाची माहिती मिळाली आहे. बर्फ बाजूला करण्याचे काम बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे सुमारे ५७ मजूर करीत होते. त्यावेळी ही घटना घडली. आयटीबीपी, एसडीआरएफ आणि प्रशासनाची पथके संयुक्तपणे काम करीत आहे. घटनास्थळी पाऊस आणि बर्फ पडत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. (Avalanche struck Chamoli)
तेथे सॅटेलाइट फोन आणि इतर उपकरणे उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांच्याशी थेट संपर्क होणे कठीण झाले आहे. परंतु आम्हाला कोणतीही जीवितहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. आम्हाला आशा आहे की आमची टीम तेथे पोहोचेल आणि कामगारांची सुरक्षित सुटका करण्यात येईल, असे तिवारी म्हणाले.
याआधी गुरुवारी लाहौल आणि स्पिती पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी या भागात हिमस्खलन होण्याचा इशारा जारी केला होता.
हेही वाचा :
मुलीचा मृत्यूशी, पालकांचा व्हिसासाठी संघर्षः सुप्रिया सुळे धावल्या मदतीला
मैतेईच्या टेंगोल गटाने शस्त्रे टाकली