महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा घडवून आणल्या, त्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची आज जयंती.भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र,गरीब मुला -मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, दिव्यांगांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी -मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुःखी व हतबल असणाऱ्यांना हिम्मत देण्याची आचरण सूत्री सांगून त्यालाच रोकडा धर्म म्हणणारे गाडगेबाबा आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वातही समाजाचा आरसा बनून मार्गदर्शन करत आहे.
प्रवीण टाके
गाडगेबाबा म्हणजे भारतीय समाजसुधारणेतील आधुनिक काळातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.वैराग्याचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे गाडगेबाबा.लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे गाडगेबाबा.अंधश्रद्धेवर थेट प्रहार म्हणजे गाडगेबाबा.दिव्यांगांचा,निराश्रीतांचा बाप म्हणजे गाडगेबाबा.जातीभेदांवर प्रहार म्हणजे गाडगेबाबा.हिंसात्मक कुळधर्मांना, नवसाला हद्दपार करणारा कर्मयोगी म्हणजे गाडगेबाबा. मुक्या प्राण्यांच्या बळी प्रथेविरुद्धचा प्रबोधनकार म्हणजे गाडगे बाबा.थोडक्यात त्यांच्या जीवनाचे ध्येय सर्वसामान्यांचे कल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि देवधर्माच्या अंध फेऱ्यात अडकून पडलेल्या समाजाला मानवतेचा श्रेष्ठ आदर्श घालणे होते.
संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव येथे झाला. लहानपणी त्यांना डेबू म्हणत.
त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई होते.आडनाव जानोरकर.लहानपणीच व्यसनाधीनतेने वडीलांचे निधन झाल्यामुळे ते आपल्या आईसोबतअकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या गावी मामाकडे राहायला गेले. त्यांच्या जीवनातील प्रारंभिक काळातील संघर्षांनी,कुप्रथांनी व त्यातून आलेल्या दुःखांनी त्यांच्या मनात समाजसेवेचा आणि दीन-दुखितांच्या मदतीचे बीज रुजवले.शेती,माती,संसारामध्ये रमलेल्या डेबुजींना तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा व कुप्रथांनी समाजासाठी लढण्यास प्रवृत्त केले. १९०५ नंतर त्यांनी कुटुंब आणि संसार त्यागून गावोगावी फिरून लोकांना समाजातील दोष समजावून सांगण्याचा निर्णय घेतला.केवळ महाराष्ट्रच नाहीत तर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश व अन्य राज्यातही त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले. (Sant Gadge Baba and social enlightenment)
त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग म्हणजे कीर्तनात्मक भजनातून अंधश्रध्दा निर्मूलन केले. आपल्या व-हाडी भाषेमध्ये सहज विनोदाची,संवादाची पेरणी करत आणि जगण्यातील विसंगती मांडत त्यांनी कर्मकांडावर हल्ला केला.त्यांचे कीर्तन म्हणजे विवेचनकार आणि श्रोते यांच्यातील प्रश्नोत्तराचा सुलभ सादरीकरणाचा प्रबोधनात्मक अविष्कार होता.या अशिक्षित माणसाच्या कीर्तनाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून आचार्य प्र.के. अत्रे, पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या विद्वानांनी खाली बसून रसग्रहण केले.साध्या सोप्या शब्दांमध्ये ते विवेचन करायचे.त्यांच्या विवेचनाला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचे पार्श्वगायन असायचे. विशेष म्हणजे संपूर्ण श्रोते भजन गायनात सहभागी व्हायचे.समाजाच्या अंधश्रद्धा, चाली, रुढी ,परंपरा यावर तुटून पडण्याच्या त्यांच्या आक्रमक शैलीचे वर्णन करताना आचार्य अत्रे यांनी म्हटले होते… “सिंहाला पहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, गाडगेबाबांना पहावे कीर्तनात..”
भारतीय संत परंपरेतील क्रांतिकारक विचार मांडणाऱ्या संत तुकाराम, संत कबीर यांच्या अभंग आणि दोह्यांचा अचूक वापर ते त्यांच्या कीर्तनात करायचे…
मुला-मुलींच्या जन्मासाठी मुक्या असाह्य प्राण्यांची हत्या करून नवस फेडणे आणि त्यासाठी कर्ज काढणे अशा रूढींवर ते आक्रमणपणे प्रहार करायचे. तुकोबारायांच्या अभंगांचा वापर करताना ते म्हणायचे…
नवसे कन्या पुत्र होती
मग का करणे लागे पती
किंवा पिंडदानासारख्या अनिष्ट प्रथांवर प्रहार करताना कीर्तनात कबीराचे दोहे वापरायचे…
जीते बाप को रोटी ना दे
वह मरे बाद पछताए
मुठ भर चावल लेकर
कौवा को बाप बनाएं
उठ सूट शेंदूर पासून देव बनवणे. पुढे त्याचे मंदिर घडविणे आणि कर्मकांडात समाजाला बुडविणे याला विरोध करताना ते म्हणायचे…
जत्रा मे पत्रा बिथाया तीर्थे बनाया पानी
भई दुनिया बड़ी दिवानी ये तो पैसे की धुलधानी
त्यांचे समाजप्रबोधनाचे विचार त्या काळातील भारतीय ग्रामीण जीवनाची परिस्थिती बदलण्याचा क्रांतीकारी प्रयत्न होते. त्या काळात भारतीय ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड, नशा,धर्मभेद,प्राण्यांचे बळी, जातीभेद,अस्पृश्यता,हुंडा पद्धती आणि निरक्षरता या सर्व सामाजिक बंधनांनी लोकांचे मन जड झालेले होते. गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनात अंधश्रद्धा, देव-धर्मा विषयी चुकीचे विश्वास आणि सार्वजनिक अस्वच्छते विरुद्ध आघात केला.
गाडगेबाबांचे कार्य सर्वसामान्यांसाठी समर्पित होते. त्यांनी सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य विषयक संदेश देण्यासाठी ते ज्या गावात प्रवेश करत, तेथे प्रथम स्वयं आणि उपस्थित लोकांना मिळून रस्ते, सार्वजनिक जागा, मंदिर परिसर, तलाव अशा सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवायचे.याच ठिकाणी त्यांनी धर्मशाळा, आश्रम शाळा, नद्यांचे घाट, पाणपोया, गोरक्षण उघडले. स्वतः खराटा घेऊन त्यांची स्वच्छता सुरू व्हायची.त्यांचा संदेश फक्त उपदेश स्वरूपात नव्हे तर प्रत्यक्ष कार्य करून दाखवून देण्याची प्रेरणा म्हणून होता. Sant Gadge Baba and social enlightenment)
कीर्तनाचा प्रारंभ हा स्वच्छता अभियानातून करणारा हा महापुरुष तत्कालीन समाज व्यवस्थेत धार्मिक पाखंडावर आसूड उमटवायचा.मंदिरात देव शोधणे ऐवजी माणसातच देव शोधा हा त्यांचा परखड संदेश होता. देव दगडात नाही तो माणसात आहे, असे ते देवकीनंदन गोपाला हे भजन गाताना उदाहरणे देऊन व श्रोत्यांशी संवाद साधून ते स्पष्ट करायचे.
गाडगेबाबांनी फक्त भाषण किंवा कीर्तनाचाच अवलंब केला नाही, तर त्यांनी आपल्या कमाईतून आणि लोकांच्या देणगीतून अनेक धर्मशाळा, अन्नछत्र, वृद्धाश्रम, गोशाळा आणि रुग्णालय परिसरात धर्मशाळा उभारल्या.मुंबई ,पंढरपुर, नाशिक, पुणे, आळंदी, देहू आणि अमरावती येथे त्यांच्या पुढाकारात धर्मशाळा उभारल्या गेल्या.
मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (१९५४) सारख्या सामाजिक उपक्रमांत त्यांनी योगदान दिले.मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम गरीब बांधवांसाठी राहण्याची सोय त्यांनी त्या काळात केली.अनेक ठिकाणी निवारे ,धर्मशाळा उभारून गरीब, दलित आणि गरजू लोकांना संरक्षण मिळवून दिले.मानवा मानवातील भेद दूर करत सहजीवनाचा आदर्श दिला.
जातीपाती,अस्पृश्यता,अज्ञानात खितपत पडलेल्या ग्रामीण जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याच भाषेत समाज प्रबोधन केले. लोकांना जात-पात, सामाजिक भेदभाव,अस्वच्छता यातून बाहेर काढत कर्मातून आयुष्य घडवण्याची शिकवण दिली.संवादावर त्यांचा विश्वास होता.शिक्षणातूनच सामाजिक सुधारणा होऊ शकते हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तत्कालीन समाज व्यवस्थेत रुजविण्याचे कार्यही त्यांनी स्वतः केले.शिक्षणाने माणूस किती मोठा होतो यासाठी ते बाबासाहेबांचे उदाहरण समोर बसलेल्या जनतेला द्यायचे.जातीभेदात, चातुर्वर्णात डुंबलेल्या तत्कालीन समाज व्यवस्थेला बाहेर काढण्यासाठीच्या त्यांच्या धडपडीचे बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कौतुक केले. गाडगेबाबांच्या समाज आणि जातीभेदाविरुद्धच्या कार्याचे महत्त्व बाबासाहेबांनी मान्य केले.गाडगेबाबा त्या काळातील काही थोर व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधणारे व्यक्ती होते. त्यांच्या कार्याला प्रेरणा आणि समन्वय दोन्ही मिळाले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी गाडगेबाबांच्या मैत्री आणि आदराचे संबध होते.भाऊरावांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचा उल्लेख ते आपल्या कीर्तनात करायचे. भाऊरावांनी गाडगेबाबांच्या निधनावरअतिशय भावनिक संवेदना व्यक्त केल्या होत्या.डॉ. पंजाबराव देशमुख, इतिहासातील अन्य एक समाजसेवक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व, यांच्या कार्यात गाडगेबाबांनी काही प्रमाणात सहकार्य केले आणि त्यांच्या योजना, शिक्षण आणि समाज सुधारणा कार्यक्रमांना पाठिंबा दिला.गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या विचारधारांमध्ये सामाजिक समता, स्वच्छता आणि ज्ञानविकास अशा मुद्द्यांवर साम्य होते.साने गुरुजी यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.तर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहून गाडगे बाबांच्या कार्याला जनतेसमोर आणले होते.
अंधश्रद्धा, वर्ण आणि सामाजिक कायदा…. गाडगेबाबांनी अंधश्रद्धा आणि जातीवादाविरुद्ध सतत भाष्य केले. त्या काळात अनेक भोंदू बाबा, महाराज आणि तीर्थस्थळांची पूजा करून आपले जीवन सुधारेल असा विश्वास ठेवत असताना गाडगेबाबांनी हे स्पष्ट केले की खोटे देव, तीर्थक्षेत्र आणि आचार हे मानवाच्या प्रगतीत व्यत्यय आणतात.देव आणि धर्म यांच्या चौकटीत भारतीय समाज व्यवस्था रसातळाला जाईल आणि त्यातून बाहेर पडल्याशिवाय नवभारताची निर्मिती होऊ शकत नाही. हे ७५ वर्षांपूर्वी या महामानवाने गावागावातील जनतेला समजून सांगण्याचे महत कार्य केले.सामाजिक सुधारणा,सामाजिक उपाय, शिक्षण आणि मानवी मूल्यांचा अवलंब करणे अधिक परिणामकारक आहे,हे त्यांनी सामान्य माणसासोबतच व्यवस्थेला समजावण्याचे धारिष्टय दाखविले
गाडगेबाबांनी आपल्या कार्याच्या शेवटच्या काळात ८ नोव्हेंबर १९५६रोजी मुंबईत एक सार्वजनिक कीर्तन केले.गाडगे बाबांचे शेवटचे भाषण आजही सर्वत्र उपलब्ध आहे.अशिक्षित असणाऱ्या या समाजसुधारकाच्या जात, धर्म,स्वच्छता आणि शिक्षणाबाबतच्या कल्पना किती स्पष्ट होत्या. क्रांतिकारी होत्या. याची जाणीव आजही समाजाला ठेवणे गरजेचे आहे.देशाने अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केल्यानंतरही त्यांचे विचार आजही कालसापेक्ष आहे. गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजसेवा केली.मात्र स्वतःच्या नावाने आश्रम, मठ उभारणे त्यांना मान्य नव्हते. ते स्वतः म्हणायचे… “मी कुणाचा गुरु नाही.माझा कुणी चेला नाही “
शेवटी २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती जिल्हयातील वलगाव येथे हा महान सुधारक अंतिम प्रवासासाठी प्रस्थान करता झाला.त्यांचा वारसा आजही जिवंत आहे – महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने “संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता व पाण्याच्या पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. तसेच अमरावती विद्यापीठाचे नांव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ठेवण्यात आले आहे, हा . त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. Sant Gadge Baba and social enlightenment)
प्रवीण टाके हे कोल्हापुरातील विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालक आहेत.