जमीर काझी : मुंबई : संघटित अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ऑपरेशन ”व्हाईट स्ट्राईक’ने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई आणि परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून ३४९ किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त केले. अवैध बाजारातील त्याची किंमत १,७४५ कोटी असल्याचे सांगण्यात येते. एनसीबीने सहा महिन्यांहून अधिक काळ सातत्यपूर्ण गुप्त माहिती संकलन आणि पाळत ठेवून ही मोहीम यशस्वी केली असून तस्करी करणाऱ्या सुत्रधारांचा शोध घेण्यात येत असल्याचे एनसीबीच्या सूत्राकडून सांगण्यात आले.
विश्वसनीय माहितीच्या आधारे पथकांनी नवी मुंबईत कळंबोली व ठाण्यात भिवंडी कॉरिडॉरमध्ये गोदामांत छापे टाकले.पायाभूत सुविधा व छुपी वाहतूक यंत्रणा वापरणाऱ्या अत्यंत संघटित आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ पुरवठा नेटवर्कचा पर्दाफाश केला.
पहिल्या कारवाई दरम्यान, एनसीबी अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील कळंबोली, सेक्टर केडब्ल्यूसी येथील केडब्ल्यूसी वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्सजवळ मारुती सुझुकी सुपर कॅरी (सीएनजी) गाडी पकडली. त्यात अंदाजे एक किलो वजनाची कोकेनची १३६ पाकिटे सापडली. ही पाकिटे विविध खोक्यांमध्ये लपवली होती.आणि त्यावर वरती क्रिकेट पॅड आणि ग्लोव्हजचा वापर करून कोकेन लपवण्यात आले होते. (349 kg of cocaine worth 1,745 crore seized in Mumbai)
एकाला अटक करून कसून चौकशी आणि जलद पाठपुरावा केल्यानंतर आरोपीने भिवंडी या प्रमुख वेअरहाउसिंग केंद्रात आणखी एक लपवलेला माल ठेवल्याची माहिती दिली.त्यानंतर एनसीबीच्या पथकाने भिवंडी येथील रेहनाल गावातील रेहनाल बस स्टँडजवळील लक्ष्मण कंपाऊंडमधील एका वेअरहाऊसमध्ये दुसरी कारवाई करून कोकेनची अतिरिक्त २१३ पाकिटे जप्त केली.
प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, हा प्रतिबंधित माल भारतात आयात केलेल्या एका मशीनच्या पोकळीत लपवण्यात आला होता. प्रत्येक पाकीट वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिथिनच्या ९ थरांमध्ये पॅक केले होते, ज्यात काळ्या तेलकट पदार्थाचा एक थरही होता.भिवंडीच्या गोदाम व्यवस्थेच्या वापरावरून एका सुनियोजित लॉजिस्टिक्स साखळीचा उलगडा होतो, ज्यात लपवलेले कोकेन असलेली यंत्रसामग्री आयात करणे, गोदामांमध्ये कोकेनच्या पाकिटांची साठवणूक व पुनर्प्राप्ती करणे आणि अंमली पदार्थांचा पुढील पुरवठा करणे यांचा समावेश आहे.या तस्करीमागील मुख्य सूत्रधार, त्याचे हस्तक, आर्थिक पुरवठादार आणि माल स्वीकारणाऱ्यांना पकडण्यासाठी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. (349 kg of cocaine worth 1,745 crore seized in Mumbai)
अमित शाहकडून कौतुक
एनसीबीच्या या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत अभिनंदन केले आहे.अमली पदार्थांच्या टोळीला निर्दयपणे चिरडून टाकण्याचा निर्धार असून एनसीबी तळापासून शोध घेऊन मोठ्या नेटवर्कला जाळ्यात पकडल्याचे त्यांनी म्हटले आहे. (349 kg of cocaine worth 1,745 crore seized in Mumbai)