किल्ले रायगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (१२ एप्रिल) किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.(Amit shah speech)
शहा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांकडे धन नव्हते, मात्र स्वराज्य संकल्पनेतून त्यांनी १०० वर्षांपासून सुरु असलेली मोगालाई संपुष्टात आणून दाखवली. अटकेपर्यंत शिवाजी महाराजांचे मावळे पोहचले. तामिळनाडू, बंगालपर्यंत पोहचले. तेव्हा लोकांनी आपला देश, आपली संस्कृती वाचली, असा सुस्कारा सोडला. स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपला देश सगळ्याच आघाड्यांवर क्रमांक एकवर असेल, असा संकल्प आपण सोडू या. जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्याचे बीज रोवले. त्याचा वटवृक्ष झाला. शिवाजी महाराजानंतर औरंगजेब आला होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला आणि त्याची कबर येथेच बांधली. (Amit shah speech on Raigad)
मी महाराष्ट्रातल्या लोकांना हात जोडून विनंती करतो की शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. देश आणि सगळे जग शिवरायांपासून प्रेरणा घेऊ शकते, असे सांगून शहा म्हणाले, स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा अमर करणे हे तीन विचार देशाच्या सीमेशी जोडलेले नाहीत तर माणसाच्या स्वाभिमानाशी जोडले गेले आहेत. आपण गुलामीच्या मानसिकतेत गेलो होतो त्या कालखंडात महाराजांनी हा विचार आपल्यासमोर ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराजाचा सूर्य देदीप्यमान केला.
टिळकांच्या स्वराज्याच्या मागणीमागे महाराजांचीच प्रेरणा
छत्रपतींचा राज्याभिषेक झाला तो हाच रायगड किल्ला. ही पवित्र भूमी शिवस्मृती केल्याबद्दल लोकमान्य टिळकांचेही आभार मानतो. इंग्रजांनी रायगड किल्ला जाणीवपूर्वक तोडण्याचे काम केले. कारण हा किल्ला वर्षानुवर्षे स्वराज्याचे प्रतीक होता. दीर्घ काळ गुलामीत ठेवण्यासाठी हे प्रतीक तोडण्यात आले मात्र लोकमान्य टिळकांनी या स्मारकासाठी कष्ट घेतले. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले. त्यामागची प्रेरणाही छत्रपती शिवाजी महाराजच होते, असेही शहा म्हणाले. (Amit shah speech)
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटले पाहिजे : मुख्यमंत्री फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावर लोटले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे स्मारक झाले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. अरबी समुद्रातील स्मारकाचा विषय न्यायालयात अडकले आहे. मात्र, आम्ही लढून ते स्मारक मोकळे करुन घेऊ, असेही ते म्हणाले. अमित शहा आज गृहमंत्री म्हणून नाही तर मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून आले असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक दर्जा प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. संविधान आणि छत्रपतींच्या विचारावर चालणारे आमचे सरकार आहे, असेही फडणवीस म्हणाले. (Amit shah speech)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपले अस्तित्व टिकून असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक निर्माण व्हावे, अशी मागणी केली. छत्रपतींच्या कुटुंबीयांबद्दल केली जाणारी वक्तव्य ही दुर्दैवी आहे. अशा महापुरुषांबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यासंदर्भात शासनाने स्वतंत्रपणे कायदा तयार करावा. दहा वर्षांपर्यंत जामीन मिळणार नाही, अशी तरतूद करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा :
कर्जमाफीची घोषणा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या तोंडाची वाफ
राखून ठेवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी ३ महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा