अकोलाः
ओडिशातून हरवलेली अकोला जिल्ह्यात भटकंती करीत आलेल्या महिलेला चार वर्षांनंतर तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आले. तिच्या कुटुंबाने संबंधित महिला मरण पावल्याचे गृहीत धरले होते. प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे ती आपल्या कुटुंबात परतली असून भेटीनंतर महिला व कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिसांना चार वर्षांपूर्वी सुमारे चाळीस वर्षांची एक महिला भटकत असताना आढळली. त्यांनी तिला निवाऱ्यासाठी अकोल्यातील जागृती महिला राज्यगृहात दाखल केले. महिलेची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तिच्याशी संवाद साधताना भाषेचाही अडसर येत होता. जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीनंतर तिच्यावर औषधोपचार सुरू झाले. महिलेच्या मानसिक स्थितीत सुधारणा झाल्यानंतर ‘चाइल्ड हेल्पलाईन’च्या समन्वयक हर्षाली गजभिये यांनी तिचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली. वेळोवेळी त्या महिलेकडून माहिती घेतली जात होती. या संवादातून तिचे नाव रमाबाटी व तिच्या गावाचे नाव दंडागुडा असल्याचे समोर आले. महिलेने जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयाचे नाव सांगितले. ते गुगलच्या माध्यमातून शोधून रुग्णालयाचे छायाचित्र महिलेला दाखवले. या प्रयत्नातून त्या महिलेचा जिल्हा नाबारंगपूर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ तिच्या जिल्ह्यातील ‘सखी वन स्टॉप’ केंद्राशी संपर्क करून त्या महिलेचे छायाचित्र व माहिती पाठवली. जिल्हा यंत्रणेकडून तिच्या गावात तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. त्या महिलेचा तिच्या कुटुंबियांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क करून देण्यात आला.
ओडिशातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसह महिलेचे पती अकोल्यात दाखल झाले. महिला व बालविकास कार्यालयाने प्रक्रिया पूर्ण करून महिलेला तिच्या पतीकडे सुपुर्द केले.