महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. २० नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शरद पवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राहुल अभ्यासूपणे भाजप महायुतीच्या कारभाराचे वाभाडे काढत होते. त्यांचे युक्तिवाद बिनतोड होते. लोकांची त्याला साथ आणि दाद मिळत होती. प्रियांका गांधी यांच्या शिर्डी आणि कोल्हापूरच्या सभा जंगी झाल्या. त्या बोलत होत्या तेव्हा इंदिरा गांधी यांची आठवण महाराष्ट्राला झाली. शालीन आणि मुद्देसूद भाषण करत त्यांनी लोकांची वाहवा मिळवली.
भाजप आणि महायुतीचे नेते प्रचार मुद्द्यावरून कटेंगे बटेंगे, वोट जिहाद, महिलांची नालस्ती, अर्वाच्य आणि अश्लील भाषा वापरून तणाव वाढवणे यागोष्टी करून निवडणुकीचे वातावरण भलतीकडे नेत होते.
वसंत देशमुख, पाशा पटेल, सदाभाऊ खोत यांनी तर कहर केला. पण देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना अभद्र बोलून स्वतची उरली सुरली पत नष्ट केली.
या वातावरणातही महाविकास आघाडीने लोकांचे मुद्दे सभामध्ये लावून धरले.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. यानिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोडून गेलेल्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात जात शरद पवार स्वत: या नेत्यांना पराभूत करण्याचं आवाहन करत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. शरद पवार फक्त टीकाच करत नाहीयेत तर भाजपसोबत गेले नसते तर तुरुंगात जावं लागेल, असं या नेत्यांनी सांगितल्याचंही ते बोलत आहेत. सहा दशकांपेक्षा जास्त राजकीय कारकीर्द असलेला हा नेता ज्यांच्यावर आगपाखड करतोय.. ते आहेत..
जेव्हा वळसे पाटलांकडे महाराष्ट्र शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून पाहायचा. कारण, त्यांचा राजकीय उगमच शरद पवारांमुळे झाला. ते पवारांचे काही काळ सचिव होते. दिलीप वळसेंचा राजकीय प्रवास पवारांच्या अवतीभोवती सुरू झाला आणि त्याचा उत्कर्ष पवारांच्या आशीर्वादाने पुढे गेला. घरातच त्यांना राजकारणाचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. १९९० आंबेगाव-शिरुर मतदारसंघातून आमदार. १९९० पासून सलग सातवेळा आमदार.
वैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, ऊर्जासह अनेक खात्यांचे मंत्री राहिले. २००९ ते २०१४ दिलीप वळसे-पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते. अत्यंत संयमी. शांत. अभ्यासू. आणि शरद पवारांचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेला नेता.
अजित दादांसोबत जातो. आणि शरद पवारांच्या विरोधात उभा राहतो. तेच भुजबळ आणि मुश्रीफ, झिरवाळ यांचे झाले. त्यांच्या याच कृत्यानं शरद पवारांचा पारा चढला. पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही किती दुखावल्या गेल्यात.
शेवटच्या सभेत बोलू म्हणत वळसे पाटलांनी दोन दिवस वेळ मारुन नेली. अखेर एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर त्यांनी भावना मोकळ्या केल्या.
ते म्हणाले, पवारांना मान्य नसेल तर ठीक. मी स्वत: कधीही म्हटलं नाही की मी शरद पवारांचा मानसपुत्र आहे. लोक म्हणायचे
जर शरद पवार म्हणत असतील तर कौटुंबिक संबंध नसतील. शरद पवारांनी असं म्हटल्याने माझ्या कुटुंबाला देखील त्रास झाला.
पवार आणि वळसे म्हणजे गुरू शिष्यात राजकीय कुस्ती सुरू झालीय. आखाडा कोण आणि कोणत्या मुद्द्यावर मारतो
याची महाराष्ट्राला उत्सुकता असणार आहे. ‘गुरू’चा कोप, शिष्य भावूक; असं काहीसं दिसलं.
एका दिवसात सहा ठिकाणी सभा घेतल्यात. सिन्नर, राहता, राहुरी,ओतूर, मंचर या ठिकाणी सभा झाल्यात. खेडची अणि भोसरीची सभा प्रचंड झाली.
काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत पवार साहेबाविषयी जे बोलला त्याची मला आता कीवसुद्धा करावी वाटत नाही. एवढी ऊर्जा असणारा माणूस आपल्याला कुठे सापडणार आहे. या वयात आणि आजारपणातही हा माणूस तरातरा डायसवर जाऊन माईक हातात घेतो ओतूरची सभा रेकाॅर्डब्रेक झाली. एक वाजताची वेळ होती. दोनेक तास उशीर झाला. लोक तब्बल तीन तास थांबून होते. आयोजक म्हणाले साहेब आधी जेवण करून घ्या. साहेब म्हणाले सभा झाल्यावरच जेवण करीन.
महाराष्ट्राला माणसं समजलीच नाहीत. असं खेदानं म्हणावं वाटतं.
‘जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं होतंय’, असं लोक बोलू लागलेत. फडणवीस यांच्या वोट जिहादच्या मुद्द्याला पवारांनी सडेतोड उत्तर दिलं.
पुण्यातल्या काही विशिष्ट भागात भाजपला जास्त मतदान होतं, त्याची आम्हाला सवय आहे. पण आम्ही त्याला कधीही व्होट जिहाद म्हटलं नाही. साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.
व्होट जिहादचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच तापला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने या मुद्द्यावर प्रचारात अधिक भर दिला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समुदायाने महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, असा आरोप महायुतीचे नेते करतात. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा आरोप केला जात आहे. आता ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांच्या एका व्हिडीओचा दाखल देऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे. याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली.
व्होट जिहाद हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी एकप्रकारे या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही याच्या विरोधात आहोत, अशा शब्दात शरद पवार यांनी व्होट जिहादवरून फडणवीस यांना लक्ष्य केले. बटेंगे तो कटेंगे हा विषयदेखील धार्मिक मुद्द्यावरचा आहे. सत्ताधारी जेव्हा हे विषय पुढे करत आहेत. याचा अर्थ आपल्याला यश मिळणार नाही, अशी खात्री त्यांना झाली आहे. त्यामुळेच धार्मिक विषय काढून निवडणूक इतर विषयांवर नेण्याचा प्रयत्न होत आहे.
महायुतीसमोर व्होट जिहाद ही एकच समस्या आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ते म्हणाले, “एक है तो सेफ है, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला नारा योग्यच आहे. भारत जोडो नावाचा एक समुदाय तयार करण्यात आला. त्यातले लोक भारत जोडोसाठी नाही तर देश तोडण्याचे काम करत आहेत. आपला देश जात, धर्म यात जेव्हा वाटला गेला तेव्हा गुलाम झाला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हा देशाचा इतिहास आहे यात आक्षेपार्ह काहीही नाही.”
काँग्रेसचे खासदार पी. चिदंबरम यांनी मुंबईत शनिवारी प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिलेली माहिती महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. ते म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची भाजपाच्या राजवटीत सर्वच क्षेत्रात घसरण झाली. महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या अत्यंत गंभीर, प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले तर रोजगार कुठून मिळणार?
शेतकरी मोठ्या संकटात, आत्महत्यांमध्ये मोठी वाढ तरीही भाजपा सरकारची शेतकरी कर्जमाफीस नकारघंटा
महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. परंतु मागील काही वर्षात भाजपा सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण झाली असून कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा ही राज्ये पुढे गेली आहेत. महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे.
महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ९.६ वरून ७.६ टक्क्यावर घसरले आहे, कृषी क्षेत्रात ४.५ टक्क्यांवरून १.९ पर्यंत घसरण झाली आहे, सेवाक्षेत्रात १३ टक्क्यावरून ८.८ टक्के घरसण, बांधकाम क्षेत्रात १४.५ टक्क्यांवरून ६.२ टक्के घरसण झालेली आहे, वित्तिय तुट वाढलेली आहे. सरकार पैसे खर्च करत आहे पण कोणत्याही क्षेत्रात वृद्धीदर वाढलेला दिसत नाही.
महाराष्ट्रात आज बेरोजगारीची समस्या अत्यंत बिकट असून बेरोजगारीचा दर १०.८ टक्के आहे. पगारी नोकरी करणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्क्यावरून ३१ पर्यंत घरसण झाली आहे तर ४० टक्के लोक स्वयंरोजगार करत आहेत. १८ हजार पोलीस भरतीसाठी ११ लाख अर्ज आले होते तर ४६०० तलाठी पदांसाठी ११.५ लाख लोकांनी अर्ज केले होते.
यातून बेकारीची अवस्था किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार का मिळत नाहीत यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले की, राज्यात नोकऱ्या आहेत कुठे? महाराष्ट्रातील तरुण मुले मुली व त्यांच्या पालकांनी २० तारखेला मतदान करताना नितीन गडकरी यांचे ‘नोकऱ्या कुठे आहेत?’ हे वक्तव्य लक्षात ठेवूनच मतदान करा.
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास मोठे उद्योग तयार होते, त्यासाठी परस्पर सामंजस्य करारही केले, प्रकल्पासाठी जागा निश्चित केली पण त्यानंतर हे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग्ज प्रकल्प, तळेगावमध्ये होणारा सेमीकंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, नागपुरला होणारा टाटा एअरबस प्रकल्प हे महाराष्ट्रातून कोणत्या राज्यात गेले हे लहान मुलगाही सांगू शकतो. रोजगार देणारे मोठे प्रकल्प जर दुसऱ्या राज्यात गेले तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळणार कुठून?
शेतकऱ्यांच्या बाबतीतही भाजपा सरकारचे ठोस धोरण नाही उलट भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्रात ६५ लाख टन कांदा उत्पादन होते, हा कांदा निर्यात केल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो पण यावेळी केंद्रातील भाजपा सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली, त्यावर ४० टक्के कर लावला. त्यामुळे कांद्याचे दर बाजारात कोसळले त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, मागील एका वर्षात महाराष्ट्रात २८५१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. शेतकरी मोठ्या संकटात असताना त्यांना कर्जमाफी देऊन त्याच्यावरचे ओझे उतरवले पाहिजे पण भाजपा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. महाराष्ट्रातील १७.४ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली आहे.
महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे, संस्कृती, परंपरा आहे. या राज्याची मान सन्मान, प्रतिष्ठेला इतर राज्यातून येऊन कोणीही धक्का लावू शकत नाही. भाजपाने जातीधर्मात फूट पाडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातील जनतेने त्याला प्रतिसाद दिला नाही.
भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण, पंकजा मुंडे यांनीही बटेंगें तो कटेंगे घोषणेला विरोध करत हे महाराष्ट्रात चालणार नाही असे म्हटले आहे. भाजपा युतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही द्वेष पसरवणारी भाषा महाराष्ट्रात चालणार नाही, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फोडीफोडीचा डाव चालणार नाही हे लक्षात आल्यानेच पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौऱ्यावर गेले.
राहुल गांधी यांचे चिमूर, अमरावती सभेतील भाषण गाजले.
धारावीची एक लाख कोटींची जमीन उद्योगपती अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार चोरले, भाजपाचे सरकार असंवैधैनिक आहे. जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यास इंडिया आघाडी आग्रही, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मात्र मौन,असे म्हणत त्यांनी भाजपचा बुरखा टराटरा फाडला.
देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली.
धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम अदानींना देण्यासाठी मविआचे सरकार पाडण्याचे काम संविधानाला धाब्यावर बसून केले. संसदेच्या अधिवेशनात जातनिहाय जनगणना व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची भूमिका काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मांडली. सर्व समाज घटकाला न्याय देण्यासाठी हे महत्वाचे निर्णय झाले पाहिजेत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड तास भाषण केले पण जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवण्यावर एक शब्द काढला नाही.
महायुती आणि महविकास आघाडी कोण सत्ता स्थापन करील? २३ नोव्हेंबरला कळेल. तोपर्यंत आपण प्रचारतल्या गमती, वाद, मुद्दे, गुद्दे यांच्यावर लक्ष ठेवूयात.