कोल्हापूर; प्रतिनिधी : केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने राज्याला मोठी निधी मिळत आहे. निधीसाठी आम्ही दिल्लीला जात असल्याने विरोधक आमच्यावर टीका करतात. तर आमचे विरोधक दिल्लीला लोटांगण घालायला जातात. मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा म्हणून मागणी करतात. तुमचा चेहरा आघाडीला चालत नाही मग महाराष्ट्राला कसा चालणार? असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला. (Eknath Shinde)
मेरी वेदर मैदानावर झालेल्या महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ सभेत ते बोलत होते. सभेला मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थित होती.
मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीने केलेल्या कामांची आलेख सादर करताना विरोधकांवर टीका केली. राधानगरी येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार या घोषणेचा समाचार घेताना ठाकरे यांच्या काळात सर्व मंदिरे बंद केली होती. त्यांना कुलपे घातली होती. आमचे सरकार आल्यावर आम्ही मंदिरे खुली केली अशा शब्दात टीका केली. आम्ही सुरू केलेली लाडकी बहिण योजना कोणालाही बंद करता येणार नाही असेही ते म्हणाले. (Eknath Shinde)
इंग्रजांच्यावर राग होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा देवेंद्र फडवणीस यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची सुरत लुटली हे म्हणायला ठाकरे यांना लाज वाटते. कोल्हापूरातील सभेत उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार अशी घोषणा केली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतला २२ वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे’. तुम्ही मुंब्य्रात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारुन दाखवा असे आव्हानही त्यांनी दिले. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवले जातायेत अशी टीका विरोधक सातत्याने करतात. ते गुजरातचे अम्बेसिटर झाले आहेत. गेल्या सव्वा दोन वर्षात महाराष्ट्रात देशातील एकून गुंतवणूकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक झाली आहे असा दावाही त्यांनी केला. पुणे मुंबई, गडचिरोलीसह कोल्हापूरात उद्योगधंदे उभारले आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या ३५ वर्षे आपण राजकारणात असून लोकांसाठी सर्वात जास्त निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत, असा दावा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसच्या तिकीट घोळाचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले ‘कोल्हापूर, सातारा ही कोल्हापूरची श्रध्दास्थाने असताना इथल्या गादीचा अपमान करताना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे’. देशात अनेक सरकारे आली पण साखर कारखान्यावरील इनकम टॅक्स रद्द करण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
सभेला कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे कागल मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ, कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राधानगरी मधील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, शाहूवाडीचे आमदार विनय कोरे, चंदगड मधील राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, शिरोळ मधील राजर्षी शाहू विकास आघाडीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, करवीरमधील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर दक्षिण मधील भाजपचे माजी आमदार अमल महाडिक, इचलकरंजी मधील भाजपचे राहूल आवाडे, हातकणंगलेतील जनसुराज्यचे अशोकराव माने या उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशिल माने, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आरपीआय कवाडे गटाचे जोगेंद्र कवाडे, आमदार सदाभाऊ खोत, प्रविण दरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राज्य सचिव महेश जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अदिल फरास, शिवसेना शहराध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.