महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीने अनपेक्षितपणे ५ पैकी ३ जागांवर दणदणीत विजय मिळविताना सत्ताधारी शक्तिशाली महायुतीतील धोबीपछाड केले आहे. सुशिक्षित व युवक मतदारानी दिलेल्या झटक्यामुळे गलितगात्र झालेल्या मविआला विशेषतः शरद पवार यांच्या गटाला मोठे बुस्टर मिळाले आहे तर राज्यात आपणच बाहुबली असून सर्व काही शक्य असल्याचा आव आणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमिनीवर आणले आहे. विशेषतः त्यांचा मतदार संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या प्रतिष्ठेच्या नागपूरात व पुण्यात पूर्ण शक्तीपणाला लावूनही पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यात त्यांना दारुण अपयश आले. त्याचबरोबर या निवडणुकीच्या निकालातून महायुतीत तीन पक्षात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सुप्त संघर्ष आणि अंतर्गत हेवेदावे चव्हाट्यावर आले आहेत. तिघेही पक्ष विकासासाठी कार्यरत असल्याचा आव आणत असलेतरी सत्तेतील अधिकचा वाटा मिळत नसल्याने ते परस्पराचा काटा काढण्याच्या मानसिकतेत पोहोचले असल्याचे या निकालातून समोर आले आहे.
जमीर काझी
पुणे, नागपूर व संभाजीनगर पदवीधराचा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला भोपळा फोडता आला नाही. तर शिक्षक मतदारसंघात दोन्ही ठिकाणी काँग्रेसला सपाटून अपयश येताना पुण्याची विद्यमान जागा गमवावी लागली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला संभाजीनगरची जागा गमवावी लागली.त्यामुळे बॅलेट पेपर झालेल्या मतदानाचा कल हा ईव्हीएम पेक्षा वेगळा असतो, या विरोधकांच्या दावा आणि सर्वसामान्य मतदारांच्या मनात असलेल्या संशयाला अधिक पुष्टी मिळाली आहे. शिवसेना फुटीनंतर एकत्र आलेल्या भाजपा व शिवसेना शिंदे गटामध्ये प्रथमच दोन्ही पक्षाच्या प्रवक्ते व नेत्यांनी एकमेकांवर उघडपणे आरोप प्रत्यारोप करीत तोंडसुख घेतले हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. (Latent conflict within the ‘Mahayuti’ comes to the fore)
या निवडणुकीत गलीतगात्र झालेल्या आणि गेल्या दीड वर्षांपासून प्रसार माध्यमानी उठसूट विलीनीकरणाच्या चर्चेत दाबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने १०० टक्के यश मिळविताना पुणे आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरच्या जागा पटकावित जोरदार मुसंडी मारली. तर भाजपाने पुणे शिक्षक , तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अमरावती शिक्षक मतदारसंघ जिंकला.तब्बल २४ ते ३० तासापर्यंत मतमोजणीत रंगलेल्या या निवडणूक निकालाचा अर्थ केवळ जागांच्या गणितापुरता मर्यादित नाही. पक्षफुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणं, महायुतीतील जागावाटप, विरोधकांमधील समन्वय, बंडखोरी, स्थानिक संघटनांचं महत्त्व आणि पसंतीक्रमाच्या मतमोजणीने बदललेलं चित्र, अशा अनेक घटकांचा या निवडणुकीत प्रभाव उमटला आहे.
जेन झीच्या पाठबळ मुळे आघाडीला बुस्टर
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत पात्रता पूर्ण करून मतदारयादीत नोंदणी केलेलेच पदवीधर आणि शिक्षक मतदान करतात. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल संपूर्ण राज्याच्या जनमताचं प्रतिनिधित्व करत नाही. तरीही पदवीधर मतदारसंघांत रोजगार, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, शिक्षणाचा दर्जा, महागाई, हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. शिक्षक मतदारसंघांत वेतन, पेन्शन, अनुदान, सेवाशर्ती, शिक्षकांची रिक्त पदं आणि शिक्षणव्यवस्थेतील अडचणी यांचा प्रभाव असतो. जेन झीचे पाठबळ मिळाल्याने आघाडीला बुस्टर मिळाले. (Latent conflict within the ‘Mahayuti’ comes to the fore)
मतदार संघ निहाय आढावा असा:
नागपूर पदवीधर मतदारसंघ : निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत नागपूर पदवीधर मतदारसंघात झाली. काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपाचे सुधाकर कोहळे यांच्यातील चुरस मतमोजणीच्या अंतिम टप्प्यापर्यंत कायम होती. दुसऱ्या क्रमांकाची पसंतीची मते मोजण्यामध्ये अखेर वंजारी यांना एकुण ६७,२३१ मते मिळाली, तर कोहळे यांना ६३६९० मते मिळाली. पहिल्या फेरीत १५ हजाराची आघाडी घेणाऱ्या कोहळेना तब्बल ३,२७१ मतांची धूळ चारीत वंजारीनी आपली जागा राखली. याजागेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १९९० ते २०१४ या काळात नागपूर प्रतिनिधित्व केले होते. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडीलही येथून दोनदा निवडून आलेले. आणि आरएसएसचे मुख्यालय असल्याने भाजपला २०२०मध्ये गमावलेली ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने सर्व प्रयत्नाची पराकष्टा केली होती. मात्र सुशिक्षित मतदार काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे पसंतीक्रमाच्या मतांनी स्पष्ट झाले.
शरद पवार गटाचे अपक्ष नितेश कराळे यांनी बंडखोरी करीत २४,२४९ मते मिळवित निकालात रंगत आणली.
पुणे पदवीधर मतदारसंघ : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक अस्तित्व हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयामुळे कायम राहिले. पक्ष फुटींनंतर विद्यमान आमदार लाड यांनी भाजपा प्रवेश केला.मात्र पक्षाने त्यांना संधी देण्याऐवजी ऐनवेळी ‘पुढारी’चे प्रताप सिंह जाधव यांची सून आणि शिक्षण महर्षी कै. डी. वाय.पाटील यांची नात स्मिता जाधव यांना तिकीट दिले. काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील हे आपल्या भाचीला मदत करतील, अशी हवाही फडणवीस यांनी निवडणूक प्रचारात पेरली.पण बंटी पाटील यांनी हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरले. त्यामुळे त्यांना १,१३,०९५ तर स्मिता योगेश जाधव यांना १,०२,७०४ मते मिळाली. हर्षदा यांच्या विजयात शिंदे गटाचे पुण्यातील नेते माजी आमदा रवींद्र धगेकर यांनी उघडपणे घेतलेली विरोधाची भूमिका चर्चेचा विषय ठरली.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर : या ठिकाणी ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या चव्हाण यांना पाणी पाजताना शिंदे गटाचे आ.अब्दुल सत्तार यांनी स्थानिक राजकारणातून त्यांना उघडपणे मदत केली .
पुणे शिक्षक मतदारसंघ : विवेकानंद शिक्षण संस्थाचे मोठे जाळे असलेल्या संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांना भाजपाने उमेदवारी देत काँग्रेसला धोबीपछाड देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांचा पणतू असलेल्या कौस्तुभ यांना त्यांच्या शिक्षण संस्थातील कार्यरत शिक्षक मतदाराचा मोठा प्रतिसाद दिला. गेले दीड वर्षे कौस्तुभ गावडे यांनी निवडणुकीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यात बांधणी केली होती. विवेकानंद शिक्षण संस्थेसह अन्य शिक्षण संस्थामधील शिक्षकांची मते मिळवण्यात त्यांना यश आले. पुणे, सोलापूरमधील भाजप संबधित शिक्षण संस्थाशी संबधित शिक्षकांनी आपली मते त्यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे विद्यमान आमदार जयंत आसगावकर तिसऱ्यास्थानी फेकले गेले. तर शिंदे गटाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष सचिन सानप यांनी जोरदार मते घेत भाजपाशी असलेला पंगा उघड केला.
अमरावती शिक्षक मतदारसंघ : या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झाले. काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते.सरनाईक यांना १६,६६३, मतं, तर पोहरे यांना ८,६३६ मतं मिळाली. देशपांडे यांना ७१७७ मतं मिळाली.काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, प्रचारातील समन्वयाच्या अभावाचा पोहरे यांना फटका बसला.
या निवडणुकीत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि उमेदवारीवरून मतभेद समोर आले. राज्यपातळीवर एकत्र असलेल्या पक्षांनी स्थानिक पातळीवरही एकमेकांच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा असते. मात्र स्थानिक नेत्यांचे हितसंबंध, इच्छुक उमेदवारांची संख्या, संघटनात्मक प्रभाव आणि जुन्या राजकीय संबंधांमुळे स्पर्धा निर्माण होते. त्याचा फटका महायुतीला बसला. (Latent conflict within the ‘Mahayuti’ comes to the fore)