जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटमध्ये त्यांचा कुठेही अपमान व्हावा, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नव्हता. राममनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्या संदर्भामध्ये जो शब्द वापरलेला होता त्या एका विशिष्ट राजकीय परिस्थितीला अनुसरून ते ट्विट होते, व्यक्तिपरत्वे नव्हते. पण काही लोकांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी या मुद्द्याचा वापर करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बुधवारी स्पष्ट केले. (Atul Londhe criticizes the NCP)
सुनेत्रा पवारांना उत्तरे देऊ दिली नाहीत
अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्त्री दाक्षिण्य सर्वोपरि मानणारे आहेत, स्त्रीचा सन्मान हे आमच्यासाठी सर्वोपरि आहे. बीडच्या पत्रकार परिषदेत कोणाचे वागणे कसे होते, पत्रकारांना कसे प्रश्न विचारू दिले नाहीत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उत्तरे देऊ दिली नाहीत हे सर्वांनी पाहिले आहे, ते ट्विट त्या अनुषंगाने होते. तरीपण ज्या पद्धतीच्या हिंसक प्रतिक्रिया देण्यात आल्या, ते लक्षात घेऊन ट्विट डिलीट करण्यात आले. स्वतः प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या ट्विटर हँडलवरून त्या संदर्भात खेद सुद्धा व्यक्त करत ते ट्विट चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे सांगितले आहे. (Atul Londhe criticizes the NCP)
राष्ट्रवादीकडून भाजपचे अनुकरण
त्यानंतरही जे काही सुरू आहे, ते केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे, ही भाजपाची प्रवृत्ती आहे. भाजपाची विचारसरणी मनुस्मृती माननारी आहे, जी स्त्रीला दुय्यम स्थान देते, स्त्रीला कुठेही सन्मान देत नाही. एका ट्विटवरून वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपाच्या पाठिंब्याने सुरु असून महाराष्ट्राच्या राजकारणाला ते धरून नाही. अजित पवार हे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मानणारे, स्त्रीचा सन्मान करणारे होते, त्यांच्या पश्चात त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाचे अनुकरण केले जात आहे असल्याचा टोला लोंढे यांनी लगावला. (Atul Londhe criticizes the NCP)