मुंबई : प्रतिनिधी : नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या उमेदवारीला ऊत आला आहे. साम,दाम,दंड, भेद, नितीचा वापर करत नगराध्यक्ष बिनविरोध करण्याठी सत्ताधाऱ्यांनी सर्व आयुधांचा वापर केला. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांनी आपापल्या नातेवाईकांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांला न्याय देण्याच्या भूमिकेला हरताळ फासला आहे.
इलेक्टिव्ह मेरीट या गोंडस नावाखाली नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना रणागंणात उतरवले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त भाजप पक्ष पुढे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाराजन यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले आहेत. (Relatives of BJP leaders in the mayoral election)
मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी बिनविरोध
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची जामनेर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रुपाली ललवाणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतिक्षा झाल्टे, अजित पवार गटाच्या सरिता बोरसे यांचे अर्ज होते. महाजनांनी पत्नीला बिनविरोध नगराध्यक्ष करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींशी चर्चा करुन मार्ग काढला. मंत्र्यांच्या नातेवाईकांसाठी सर्वच पक्षाचे नेते एक होतात आणि कार्यकर्त्यांना मात्र झुंजवतात, अशी चर्चा यामुळे सुरु झाली आहे.
मंत्री रावल यांच्या मातोश्री बिनविरोध
पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल बिनविरोध निवडून आल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या शरयू भावसार मैदानात होत्या. त्यांच्या अर्ज बाद ठरवण्यात आल्यामुळे पणनमंत्र्यांच्या मातोश्री बिनविरोध निवडून आल्या. जयकुमार रावल यांच्या दबावामुळे आपला अर्ज बाद ठरवण्यात आल्याचा आरोप शरयू भावसार यांनी केला आहे. (Relatives of BJP leaders in the mayoral election)
आमदार मुंदडाचे सासने नगराध्यपदाचे उमेदवार
बीडमध्ये भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचा पुतण्या अंबडमधून उमेदवार आहे. राष्ट्रवादीतून नुकताच भाजपमध्ये आलेले योगेश क्षीरसागर यांनी पत्नीला नगरसेवक करण्याचा चंग बांधला आहे. आमदार प्रताप अडसड यांची बहीण नगरपालिकेच्या मैदानात आहे.
विरोधी उमेदारांचा अर्ज छाननीत बाद
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राजन पाटील यांची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. १७ नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्यानंतर त्यांनी सून प्राजक्ता यांना बिनविरोध नगराध्यक्ष करण्यासाठी साम,दाम, दंड, भेद, नितीचा वापर केल्याची चर्चा आहे. त्यांच्या विरोधातील अजित पवार गटाच्या उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. (Relatives of BJP leaders in the mayoral election)
आमदारांचे नातेवाईक नगराध्यक्षपदाच्या रिंगणात
भुसावळमध्ये मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, खामगावमध्ये मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिणी अपर्णा फुंडकर, यवतमाळमध्ये प्रियदर्शनी उईके यांची मुलगी प्रियदर्शनी उईके, चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण, धामणगाव रेल्वे मधून आमदार प्रताप अडसड यांची बहिण अर्चना रोठे, दर्यापूरमधून आमदार प्रकाश भाकरसाळे यांच्या पत्नी नलिनी भाकरसाळे, बाळापूरमधून आमदार हरिष पिंपळे यांचे बंधू भुपेंद्र पिंपळे, अंबड मधून आमदान नारायण कुचे यांचे पुतणे उज्ज्वल कुचे, अक्कलकोटमधून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे भाऊ मिलन कल्याणशेट्टी, देवळाली प्रवरा मधून माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचा मुलगा सत्यजीत कदम, देवळीमधून माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस, जालना मधून माजी आमदार विलास खरात यांचे पुत्र विश्वजीत खरात, गेवराईतून माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या वहिणी गीता पवार, सासवड मधून माजी आमदार संजय जगताप यांच्या आई आनंदी जगताप, ईश्वरपूरमधून माजी मंत्री अण्णा डांगे यांचा मुलगा चिमण डांगे, फलटण मधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे भाऊ समशेरसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत. (Relatives of BJP leaders in the mayoral election)
संगमनेरमधून पंजा गायब
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा सिल्लोड नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. बुलढाणा येथे आमदार संजय गायकवाड यांची पत्नी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहे. विधान परिषदेतील अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी देखील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेसचा पंजा संगमनेरमधून गायब झाला आहे. जयसिंगपूर नगराध्यक्षपदासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.