Home » Blog » डॉ.डी.वाय.पाटील अनंतात विलीन

डॉ.डी.वाय.पाटील अनंतात विलीन

by प्रतिनिधी
0 comments
Dr. D. Y. Patil passes away

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कसबा बावडा येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर जमलेल्या देशभरातील मान्यवर, विराट जनसमुदायाच्या साक्षीने बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाला साश्रूपूर्ण नयनांनी संजय डी.पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी अग्नी दिला. उपस्थितांनी यावेळी ‘डी.वाय.पाटील अमर रहे’ च्या घोषणा दिल्या. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास होणार आहे. (Dr. D. Y. Patil passes away)

कोल्हापूर, मुंबई, पुण्यासह देशभरातील अनेक ठिकाणी उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा वाहत ठेवणाऱ्या शिक्षणमहर्षी डी.वाय.पाटील यांचे मंगळवारी (दि.४) सकाळी अकराच्या सुमारास कसबा बावडा येथील राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यांचे अत्यंदर्शन घेण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी धाव घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी मंत्री जयवंतराव आवळे, अण्णासाहेब डांगे, संजयबाबा घाटगे, बाबासाहेब पाटील सरुडकर, के.पी.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, राजूबाबा आवळे, राजू आवळे, जयश्री जाधव यांच्यासह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. (Dr. D. Y. Patil passes away)

उपमुख्यमंत्री शिंदे, मल्लिकार्जुन खर्गेकडून अंत्यदर्शन

आज गुरुवारी सकाळपासून कसबा बावडा येथील यशवंत निवासात अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. आज दिवसभरात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर रुपाराणी निकम, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषद माजी विरोधीपक्षनेते आमदार अंबादास दानवे, आमदार जयंत पाटील, आमदार अमित देशमुख, राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. विश्वजित कदम, अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहूल आवाडे, चंद्रदीप नरके, जयंत आसगावकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार संभाजीराजे, निवेदिता माने, माजी मंत्री सर्वश्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, माजी खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने, छत्रपती संभाजी महाराज, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, मालोजीराजे, राजू आवळे, राजीव आवळे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड. अभिनेते भरत जाधव  आदी मान्यवरांनी दर्शन घेतले व आदरांजली वाहिली.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेस सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या वाहनातून तिरंगा ध्वजात लपेटलेल्या पार्थिवावर फुलांची उधळण करण्यात आली. यशवंत निवासपासून डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, भगवा चौक मार्गे कसबा बावड्यातील प्रमुख रस्त्यांवर अंअंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. अंत्ययात्रा कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर पोहोचली. तिथे फुलांनी सजवलेल्या चबुतऱ्यांवर अंतिम विधी करण्यात आला. शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. मान्यवरांनी पुष्पचक्र वाहिले. पोलिस दलाकडून हवेत बंदूकीच्या फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर डी.वाय.पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजय पाटील, आमदार सतेज पाटील अग्नी दिला यावेळी दोघां बंधूंच्या मनाचा बांध फुटला. अश्रूंना वाट मोकळी करत अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. विजय डी पाटील, डॉ.अजिंक्य डी पाटील, डॉ. श्री. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. पी. डी. पाटील यांच्यासह कौटुंबिक सदस्य उपस्थित होते. (Dr. D. Y. Patil passes away)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!