Home » Blog » राजधानी दिल्लीत `संसद से सडक तक` `जेन झी`चा एल्गार

राजधानी दिल्लीत `संसद से सडक तक` `जेन झी`चा एल्गार

0 comments

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणांची मागणी करत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो विद्यार्थी, तरुण आणि नागरिक जंतर-मंतरवर जमले. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी निर्माण केलेले अडथळे पार करून आंदोलकांनी संसद भवनाकडे धाव घेतली. संसद भवनापासून दीडशे मीटरपर्यंत त्यांना रोखण्यात पोलिसांना यश आले. (CJP Parliament protest)

दरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली.  संसदेत विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना वारंवार लोकसभेचे कामकाज स्थगित कराव लागले. राज्यसभेचे कामकाजही गोंधळामुळे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.

दरम्यान संसद भवनाकडे जाण्यापासून रोखल्यानंतर काही आंदोलकांनी नीट परीक्षा घेणा-या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) कार्यालयाकडे कूच करून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

संसदेकडे जाणारे सहा मार्ग असून त्या सहाही मार्गांवर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संसद भवनाची सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. (CJP Parliament protest)

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या वर्तनावरूनही वाद निर्माण झाला असून सीजेपीने गंभीर आरोप केले आहेत. मोर्चा मोडून काढण्यासाठी पोलिसांनी व्यापक तयारी केली असून परिसरातील सीसीटीव्ही बंद करण्यात आले आहेत. दगडांनी भरलेले ट्रक परिसरात उभे करण्यात आले आहेत. “हे सर्व का केले जात आहे?” असा सवाल CJP ने उपस्थित केला आहे. सकाळी काही काळ आंदोलक आणि सुरक्षा जवानांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला.

अभिजित दिपके यांचे उपोषण मागे

कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी आपले उपोषण मागे घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास दिली. दिपके यांनी स्वतः याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सोशल मीडिया पोस्ट केलेली नाही. (CJP Parliament protest)

जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा

CJP चे प्रमुख प्रवक्ते सौरव दास यांनी एक्सवर माहिती दिली की, ते आणि आशुतोष रांका हे पक्षाच्या वतीने भाजपचे राज्यसभेतील नेते, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. सकाळी सरकारकडून चर्चेसाठी संपर्क साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. मोठ्या संख्येने तरुण येथे जमले आहेत.”, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी CJP नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. पोलिसांनी काही अंतर चालल्यानंतर मोर्चा थांबवण्याची सूचना केली, मात्र CJP ने ती मान्य केलेली नाही. मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले, “सरकारने आमच्याशी उशिरा चर्चा सुरू केली. आता मोर्चा कसा थांबवायचा?” (CJP Parliament protest)

पोलिसांच्या मते सुमारे आठ हजार आंदोलक जंतर-मंतरवर उपस्थित असून त्यांना रोखण्यासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी, पाण्याच्या तोफा आणि अश्रुधूराची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांच्या मते, २० हजारांहून अधिक लोक जंतर-मंतर आणि परिसरात जमले आहेत.

पोलिसांचा दावा (CJP Parliament protest)

“जंतर-मंतरवर पोलिसांकडून हिंसाचार किंवा मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेण्याच्या घटना घडल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. आंदोलन अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हाताळले जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा,” असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

राजकीय नेत्यांचा पाठिंबा

आम आदमी पक्षाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री आतिशी, खासदार संजय सिंह आणि मनीष सिसोदिया आंदोलनस्थळी पोहोचले. सिसोदिया यांनी यापूर्वी देशभरातील तरुणांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत NEET प्रश्नपत्रिका गळतीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार आंदोलनात सहभागी झाले. डिंपल यादव यांना अटक करण्यात आल्याचे समाजवादी पार्टीने कळवले आहे. काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरीही आंदोलनस्थळी पोहोचल्या. आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझाद तसेच अभिनेते प्रकाश राज आंदोलनस्थळी पोहोचले. चंद्रशेखर आझाद म्हणाले, “भारतीय युवक म्हणून मी तरुणांचे दुःख समजतो. त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी येथे आलो आहे.”

फक्त तीन घोषणा

आशुतोष रांका यांनी आंदोलकांना फक्त तीन घोषणाच देण्याचे आवाहन केले— भारत माता की जय, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या आणि इन्किलाब झिंदाबाद

पूर्वी काही आंदोलने बदनाम करण्यासाठी असामाजिक घटकांनी वादग्रस्त घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे यावेळी खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. (CJP Parliament protest)

सोनम वांगचुक यांच्या तीन अटी

सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्यामुळे सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर CJP संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. ते आज दुपारी मागे घेण्यात आले.

रुग्णालयातून लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी तीन अटी घातल्या आहेत. त्यांनी हस्ताक्षरात एक्सवर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे कीः

“प्रिय मित्रांनो आणि समर्थकांनो, तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारले आहे की मी माझे उपोषण कधी संपवणार? मी यापूर्वीच माझ्या समर्थकांना सांगितल्याप्रमाणे, मी २० जुलै रोजी माझे उपोषण संपवेन, जर पुढीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण झाली तर—

अ) सरकारने शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयशांची — म्हणजे पेपर फुटी वगैरेची जबाबदारी स्वीकारली,

किंवा

ब) मी आणि सीजेपीचे (CJP) नेतृत्व संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो आणि तिथे विविध पक्षांचे खासदार व नेत्यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन दिले,

किंवा

क) प्रकृती किंवा इतर कारणांमुळे मला हे शक्य झाले नाही, तर विविध पक्षांचे खासदार आणि नेत्यांनी रुग्णालयात येऊन वरीलप्रमाणेच आश्वासन दिल्यास मी माझे उपोषण मागे घेईन.

सफदरजंग रुग्णालयातील माझ्या बेकायदेशीर नजरकैदेतून हे आवाहन करीत आहे.  येथे माझ्या हालचालीवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्व प्रकारच्या संवादावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

या आंदोलनाला काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आझाद समाज पक्ष यांसह अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!