Home » Blog » विजया मेहतांच्या निधनाने रंगभूमी पोरकी

विजया मेहतांच्या निधनाने रंगभूमी पोरकी

by प्रतिनिधी
0 comments
Vijay Mehta passes away

मुंबई : प्रतिनिधी : मराठी रंगभूमीला आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाने शिखरावर नेणाऱ्या विजया मेहता यांचे मंगळवारी (दि.३०) यांचे मुंबईत राहत्या घरीच निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी पोरकी झाली आहे. मराठी रंगभूमीवर अभिनय करताना त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटके गाजली होती. त्यांच्या तालमीत नाना पाटेकर, विक्रम गोखले, अशोक सराफ हे कलाकार घडले.

रंगायन चळवळ सुरू केली

विजया जयवंत हे विजया मेहता यांचे मूळ नाव असून त्यांच्यावर थिऑसॉफिकल सोसायटीत कार्यरत असलेले वडील दत्तात्रय जयवंत यांचा सुरवातीच्या काळात प्रभाव होता. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ ला बडोदा येथे झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी घेऊन थेट अभिनयाकडे वळल्या. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. सुप्रसिद्ध नाट्य प्रशिक्षक इब्राहिम अल्काझी यांच्या त्या शिष्या होत्या. त्यांनी संपूर्ण आयुष्य रंगभूमीला वाहून घेतले. त्यांनी रंगायन नावाची चळवळ सुरू केली. या चळवळीत डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडूलकर हे कलाकार कार्यरत होते. (Vijay Mehta passes away)

झुंजारराव नाटकात कमळजा च्या भूमिकेचे कौतुक

शेक्सपिअरच्या अॅथिल्लो नाटकाचे रुपांतर झुंजारराव करण्यात आले. त्यातील ‘कमळजा’ या त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. त्यांनी ‘संशयकल्लोळ’, ‘तुझे आहे तुझपाशी’, ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून भूमिका साकारल्या. त्यानंतर १९६० च्या दशकापर्यंत मराठी रंगभूमीचा त्या  चेहरा होत्या.   विजया मेहता यांचा पहिला विवाह हरीन खोटे यांच्याशी झाला. हरीन हे दुर्गा खोटे यांचा चिरंजीव होते. त्यांना रवी आणि देवेन ही दोन मुले झाली. हरीन यांच्या मृत्यूनंतर विजयाबाईंनी फारोख मेहता यांच्याशी विवाह केला. त्यांना अनाहिता ही मुलगी होती. ‘झिम्मा आठवणींचा गोफ’ हे विजयाबाईंचे आत्मचरित्र आहे. (Vijay Mehta passes away)

हमिदाबाईची कोठी, पुरुष नाटके गाजली

विजयाबाईने अनेक नाटके दिग्दर्शित करत त्यात भूमिकाही केल्या. ‘मला उत्तर हवंय’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘एक घरात होती’, ‘संध्याछाया’, ‘जास्वंदी’, ‘अखेरचा सवाल’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘बॅरिस्टर’, ‘सावित्री’, ‘पुरुष’ ही नाटकं दिग्दर्शित केली. इंडो जर्मन थिएटरसाठी ‘मुद्राराक्षस’, ‘शाकुंतल’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’ ही नाटकं त्यांनी जर्मनी रंगभूमीवर सादर केली. हमिदबाईची कोठी, पुरुष, वाडा चिरेबंदी ही नाटकं मराठी रंगभूमीवर माईलस्टोन ठरली.

दिग्गज कलाकार घडले

विजया मेहतांची नाट्यसृष्टीत बाई अशी ओळख होती. बाईंच्या मागदर्शनाखाली अनेक कलाकार घडले. त्यामध्ये नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, अशोक सराफ, विक्रम गोखले, दिलीप कुलकर्णी हे दिग्गज कलाकार घडले. ‘स्मृतीचित्रे’, ‘रावसाहेब’, ‘पेस्तनजी’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’, अमोल पालेकर दिग्दर्शित ‘क्वेस्ट’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.

पुरस्कारांनी गौरव

विजया मेहतांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना नाट्यदर्पण, संगीत नाटक अमादमी पुरस्कार, गो.ब.देवल पुरस्कार, महाराष्ट्र गौरव, कालिदास सन्मान, विष्णुदास बावे, दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, गोदावरी गौरव, महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कार, पु.ल.देशपांडे या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला.  (Vijay Mehta passes away)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00