Home » Blog » शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

by प्रतिनिधी
0 comments
Dr. R.K. Kamat Selected as Vice-Chancellor of Shivaji University

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कमलाकार उर्फ आर.के. कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज ही घोषणा केली. आदेशाची प्रत आज सायंकाळी विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाली.

डॉ. राजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरु ठरले आहेत. डॉ. दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडेच कुलगुरू पदाचा पदभार आलेला आहे. डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. सध्या ते मुंबई येथील डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. (Dr. R.K. Kamat Selected as Vice-Chancellor of Shivaji University)

डॉ. राजनीश कमलाकर कामत यांचा परिचय….शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. राजनीश कमलाकर कामत यांचे मूळ गाव कागल (जि. कोल्हापूर) असून त्यांचा जन्म मिरज (जि. सांगली) येथे झाला. त्यांचे कुटुंब करवीर संस्थान आणि कोल्हापूरच्या सामाजिक-शैक्षणिक परंपरेशी निगडित आहे. त्यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराजांचे खासगी वैद्य होते. त्यांचे काका डॉ. बाळकृष्ण कामत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कागल येथे त्यांच्या घरी मुक्काम केला होता. त्यांचे वडील कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागात उपअधीक्षक पदावर कार्यरत होते.

डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दोन्ही पदव्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. पुढे त्यांनी गोवा विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथे उच्च तांत्रिक प्रशिक्षण घेतले.

गोवा, कोल्हापूर आणि सोलापूर येथील विद्यापीठांमध्ये सुमारे अठ्ठावीस वर्षांचा अध्यापनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित कार्यकारी बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, स्नायुरूपी संगणन, यंत्रशिक्षण, विद्युत परिपथ रचना आणि सायबर-भौतिक प्रणाली या विषयांमध्ये त्यांनी संशोधन कार्य केले आहे. त्यांनी तेवीसहून अधिक अभ्यासक्रम विकसित केले आहेत. (Dr. R.K. Kamat Selected as Vice-Chancellor of Shivaji University)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे त्यांनी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या सहकार्याने क्वांटम संगणन उत्कृष्टता केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून त्यांची १३ आंतरराष्ट्रीय पुस्तके प्रकाशित आहेत.

संशोधनासाठी त्यांनी देश-विदेशांतून पंचवीस कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त केला. पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान, मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि युरोपियन महासंघ यांच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या एसईआरसी तरुण शास्त्रज्ञ जलदगती योजनेअंतर्गत त्यांना संशोधन अनुदान मिळाले.

त्यांच्या नावावर ११ मंजूर स्वामित्व हक्क, १३ प्रकाशित आणि ४३ दाखल स्वामित्व हक्क (पेटंट) आहेत. यामध्ये जैव-पदार्थ आधारित मेंदू-प्रेरित संगणन साधन, स्मार्ट प्रकाश-संधारित्र साधन, कीटकनाशक शोध प्रणाली, आरोग्यसेवेसाठी महाकाय माहिती साधन आणि हस्तमुक्त स्मार्ट आवाज सहाय्यक साधन यांचा समावेश आहे. त्यांपैकी एका संशोधनाला युनायटेड किंग्डममध्ये रचना स्वामित्व हक्क प्राप्त झाला आहे.

डॉ. कामत यांनी विविध विद्यापीठांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. २०२२ पासून ते डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून कार्यरत होते. त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे प्रभारी कुलगुरू म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना तेरा वर्षांहून अधिक सांविधानिक प्रशासकीय अनुभव आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेकडून (नॅक) मिळालेल्या ‘अ++’ मानांकन प्रक्रियेमध्ये त्यांनी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक म्हणून मोलाचे योगदान दिले. निष्पत्ती आधारित शिक्षण, अध्ययन व्यवस्थापन प्रणाली, ३६० अंश अभिप्राय आणि गुणवत्ता प्रयोगशाळा या उपक्रमांमध्ये त्यांनी काम केले. (Dr. R.K. Kamat Selected as Vice-Chancellor of Shivaji University)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00