कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन जीव मारण्याची धमकी देणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार पवारांची पोलिस अधिकाऱ्यासमवेत खडाजंगी उडाली. तासाभराच्या आंदोलनात पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Rohit Pawar stages a sit-in protest at the police station)
ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शिर्षकावरुन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. गायकवाडांच्या धमकीचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. तसेच ज्येष्ठ नेते पानसरे यांच्याबाबत आमदार गायकवाड यांनी गैरउद्गारही काढले. आमदार गायकवाड यांच्या धमकीचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने शिवाजी चौकात आमदार गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलनही करण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी गुरुवारी दुपारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्या विरोधात तक्रार देणार दिली. पण पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा सुरू होती. (Rohit Pawar stages a sit-in protest at the police station)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी पानसरे यांच्या घरी भेट देऊन गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या दुचाकीवरुन राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळवला. त्यांनी पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांना चोवीस तास उलटूनही आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न केला. तुमच्यावर गृहमंत्री, वरिष्ठांचा दबाव आहे का अशी विचारणा केली. यावेळी आमदार पवार आणि निरीक्षक होडकर यांच्या खडाजंगी उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून हटणार नाही असा इशारा दिला. (Rohit Pawar stages a sit-in protest at the police station)
त्यानंतर रोहित पवार यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात ठिय्या मारला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर.के.पवार, शिवसेनेचे विजय देवणे, कॉ. सतीशचंद्र कांबळे, रघू कांबळे, गिरीष फोंडे, महानगरपालिका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक होडकर यांनी आमदार संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी असून वकीलांशी चर्चा करुन कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यानंतर निरीक्षक होडकर यांनी वरिष्ठ अधिकारी आणि वकिलांशी संपर्क साधला. त्यानंतर पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू केले. (Rohit Pawar stages a sit-in protest at the police station)