कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भिमा कृषी व पशु प्रदर्शन येत्या १३ ते १६ फेब्रुवारी मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०२६ मध्ये भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत. याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. (Bheema Agriculture and Livestock Exhibition organized)
प्रदर्शनात प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दोनशे महिला बचत गटांच् स्टॉल असणार आहेत. प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत. (Bheema Agriculture and Livestock Exhibition organized)
१५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनिल काटकर, सर्जेराव धनवडे दादा, अशोक सिधनेर्ले, इंद्रजीत जाधव,जिल्हा कृषी अधीक्षक महेश मस्तोळी,जिल्हा कृषी अधीक्षक नामदेव परिट, कृषी अधिकारी युवराज पाटील,किरण रणदिवे आदी उपस्थित होते. (Bheema Agriculture and Livestock Exhibition organized)