कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या महिला वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून विद्यार्थिनीने आत्महत्या केली. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१ रा. सांगली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेने विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली. ती शिवाजी विद्यापीठाच्या एम.एसस्सी (भूगोल)च्या पहिल्या वर्गात शिकत होती. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. (Student suicide)
गायत्री रेडेकर हिने शिवाजी विद्यापीठात एम एस्सी फर्स्ट भूगोल या विषयासाठी प्रवेश घेतला होता. विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृहातील ५४ क्रमांकाच्या खोलीत दोन मैत्रिणींसह ती राहत होती. वसतिगृह अधीक्षक डॉ. मीना पोतदार यांच्या परवानगीने गायत्री रेळेकर आठ ते ११ ऑगस्टदरम्यान सांगलीइथल्या घरी गेली होती. आज सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ती गावाहून विद्यापीठातील होस्टेलवर परतली. ती फोनवर बोलत होती. त्यानंतर मात्र तिच्या रूमचा दरवाजा बंदच होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याच खोलीत राहणारी तिची सहकारी रूमवर आली. दरवाजा बंद असल्याने तिने बराच वेळ गायत्रीला हाका मारुनही खोलीतून प्रतिसाद आला नाही.
तिने इतर मैत्रिणींच्या मदतीने दरवाज्याच्यावरील बाजूस असलेल्या खिडकीतून रुममध्ये डोकावले असताना गायत्रीने फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर सुरक्षारक्षक तसेच वसतिगृहाच्या अधीक्षकांनी खोलीचा दरवाजा उघडला.
याबाबत राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली. प्रभारी पोलीस निरीक्षक सरगर तसंच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांनी वसतिगृहातकडे धाव घेतली. (Student suicide)