बेळगाव : प्रतिनिधी : उदे गं आई उदे च्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरणात कर्नाटकातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीची यात्रा अतिशय उत्साहात झाली. मार्गशीर्ष पौर्णिमेला भरलेल्या यात्रेला केवळ कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा आणि अन्य राज्यातील असंख्य भाविकांनी हजेरी लावली होती. (Renuka Devi’s pilgrimage to Saudatti)
भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत बुधवारी कंकण मंगळसूत्र विधी पार पडला. गुरुवारी सकाळी महायज्ञ करून धार्मिक विधिना प्रारंभ झाला. महायज्ञ झाल्यानंतर देवीला साडी हळद-कुंकू, काकणे भक्तांनी अर्पण केली. देवींची महापूजा झाल्या नंतर आरती करून महानैवेद्य दाखवण्यात आला. यल्लमा डोंगरापासून तीन किलोमीटर अंतरावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जोगुळभावी येथील कुंडात भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. दोन दिवसात पाच लाखाहून अधिक भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. (Renuka Devi’s pilgrimage to Saudatti)