Home » Blog » Boycott of Shiv Sena cabinet : शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार

Boycott of Shiv Sena cabinet : शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार

by प्रतिनिधी
0 comments
Boycott of Shiv Sena cabinet

जमीर काझी :  मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील पक्षांतर्गत फोडाफोडीच्या राजकारणाचे पडसाद आता सरकारमध्ये उमटत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात भाजपाकडून होत असलेल्या फोडाफोडीमुळे आणि विरोधातील वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमकपणे आक्षेप घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर उप मुख्यमंत्री शिंदे वगळता त्यांच्या अन्य सर्व मंत्र्यांनी बहिष्कार घातला. (Boycott of Shiv Sena cabinet)

शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे नाराजी

 पक्षातंर्गत प्री-कॅबिनेटला सर्वजण हजर होते, मात्र कॅबिनेट बैठकीला त्यांनी दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत समन्वय राखून तोडगा काढू, असे त्यांना आश्वासन दिले आहे, अशी माहिती शिवसेनेतील एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली. राज्यातील नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असताना दोन प्रमुख सत्ताधारी पक्षातील उघड नाराजी चर्चेचा विषय बनली आहे. (Boycott of Shiv Sena cabinet)

नेमके काय घडले?

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच शिवसेनेतील मंत्र्यांनी अचानक नाराजी व्यक्त करत कॅबिनेटला न बसण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते थेट मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले आणि भाजपाकडून सुरू असलेल्या पक्षप्रवेश आणि जागावाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेतील एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, भाजपात सुरू असलेले पक्षप्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील जागावाटप आणि स्थानिक नेतृत्वाकडून सातत्याने डावलण्याच्या भावना या मुद्द्यांवरून शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेना घेरण्यासाठी भाजपाकडून आक्रमक पक्षविस्तार सुरू असल्याने शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यातील काही ठिकाणी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. याच नाराजीतून आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. (Boycott of Shiv Sena cabinet)

निवडणूक कामात व्यस्त : मंत्री गुलाबराव पाटील

आम्ही निवडणूक कामात व्यस्त – गुलाबराव पाटील :  “आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला महानगरपालिका, नगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काम दिले होते. त्यामुळे शिवसेनेचे सगळे मंत्री आपापल्या कामात व्यस्त होते”, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

You may also like

error: Content is protected !!