नवी दिल्ली : भारताचा चीनसोबतचा सीमावाद हा देशासाठी सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे, असे स्पष्ट मत संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी (५ सप्टेबर) व्यक्त केले. (India-China border dispute)
गोरखपूरमधील एका मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. भारताचा चीनसोबतचा सीमावाद हा देशासाठी सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. भारताने १९४७, १९६२ आणि १९६५ मध्ये या मुद्द्यावर अनेक युद्धे लढली आहेत, याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. (India-China border dispute)
जनरल चौहान यांनी असेही म्हटले की, भारताविरुद्ध पाकिस्तानचे छुपे युद्ध हे पुढचे मोठे आव्हान आहे. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानची रणनीती नेहमीच ‘हजार ब्लेडनी भारताला रक्तबंबाळ करणे’ अशी राहिली आहे.
‘‘देशांसमोरील आव्हाने क्षणिक नसतात; ती वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात असतात. मला वाटते की चीनसोबतचा सीमावाद हा भारतासमोर सर्वांत मोठा आव्हान आहे, ते कायम राहील. दुसरे मोठे आव्हान म्हणजे पाकिस्तानचे भारताविरुद्धचे प्रॉक्सी युद्ध, ज्यामध्ये ‘भारताला हजार ब्लेडनी रक्तबंबाळ’ करण्याची पाकची रणनीती आहे,’’ असे अनिल चौहान म्हणाले.
‘‘बदलती युद्धनीती हे आणखी एक आव्हान आपल्यासमोर आहे. त्यात आता सायबर आणि अवकाश युद्धांचा समावेश आहे. आमचे दोन्ही विरोधक अणुशक्तीने सज्ज आहेत. त्यांच्याविरुद्ध आपण कोणत्या प्रकारचे ऑपरेशन करायचे हे ठरवणे नेहमीच एक आव्हान राहील,’’ असे ते पुढे म्हणाले. (India-China border dispute)
मे महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरवरही जनरला चौहान यांनी भाष्य केले.
‘‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्हाला नियोजन आणि लक्ष्यांची निवड यासह पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य होते. दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणे हे उद्दिष्ट नव्हते, तर आमच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका, असा संदेश देणे हे उद्दिष्ट होते,’’ असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की ऑपरेशन सिंदूर हे एक बहु-डोमेन ऑपरेशन होते, ज्यामध्ये सायबर युद्ध आणि लष्करी शाखांमधील समन्वय यांचा समावेश होता. जनरल चौहान गुरुवारी गोरखपूर येथे पोहोचले. गोरख युद्ध स्मारकाच्या नूतनीकरण आणि गोरख संग्रहालयाच्या पायाभरणीसाठी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत सामील झाले. त्यांनी गोरखनाथ मंदिरात प्रार्थना देखील केली.