Home » Blog » Radio mahotsav: रेडिओ नसता तर मी नसते : आशा भोसले

Radio mahotsav: रेडिओ नसता तर मी नसते : आशा भोसले

by प्रतिनिधी
0 comments
Radio mahotsav

मुंबई : विशेष प्रतिनिधी : रेडिओचे महत्व पूर्वापार आहे. आजही ते अबाधीत असल्याचे सांगत रेडिओ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडिओचे महत्व अधोरेखीत केले. निमित्त होते ते महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्याचे. (Radio mahotsav)

यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी, ‘रेडिओ नसता तर मी नसते,’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी फडणवीस यांची विविध रेडिओ वाहिन्यांच्या सहा रेडिओ जॉकींनी प्रकट मुलाखत घेतली. त्यातून  मुख्यमंत्र्यांनी आपल्या रेडिओवरील संगीत ऐकणे, गाणे लिहिण्याविषयी मनमोकळा संवाद साधला.

ते म्हणाले, ‘’आमच्या लहानपणी दिवसाची सुरूवात सकाळी रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. विविध भारती रेडिओ वाहिनीवरील गाणी अगदी न चुकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच नाळ जुळली. शासन दरबारी रेडिओ क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी काही तरी केले पाहिजे, हा विचार सातत्याने होता. या पुरस्कार सोहळा आयोजनातून त्याचे समाधान लाभत आहे. रेडिओवर कार्यक्रम सुरू असताना माणूस दिसत नाही, पण सचित्र दर्शन शब्दांमधून घडत असते, असे विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. (Radio mahotsav)

जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजिलेल्या सोहळ्यात रेडिओ जॉकी सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे समन्वयन हेनल मेहता यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे उपस्थित होते.

रेडिओचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला. रेडिओ केवळ संगीत ऐकण्याचे साधन नाही, तर संवादाचेही माध्यम होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले, अशा शब्दात   रेडिओचे महत्व मुख्यमंत्री फडणवीस यांनी विषद केले. (Radio mahotsav)

मंत्री शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.

विश्वनाथ ओक यांना ‘जीवनगौरव’
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रेडिओ नसते, तर मी नसते, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आशा रेडिओ जीवनगौरव पुरस्कार २०२५ विश्वनाथ ओक यांना देण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार हा रेडिओ मिर्चीचे रेडिओ जॉकी जितूराज यांना, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मल्लिशा यांना प्रदान करण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटी यांना, तर आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात १२ रेडिओ प्रकारात पुरस्कार देण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00