लीड्स : भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात हेडिंग्लेच्या खेळपट्टी भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. येथील कोरड्या हवामानामुळे खेळपट्टी फलंदाजांना, तसेच फिरकी गोलंदाजीसाठी पूरक ठरू शकते. (Headingley Test)
या मालिकेतील पहिली कसोटी २० जूनपासून हेडिंग्ले येथे रंगणार आहे. हेडिंग्ले स्टेडियमचा इतिहास पाहता भारतासाठी हे स्टेडियम फारसे लाभदायी ठरलेले नाही. भारताने आतापर्यंतच्या इंग्लंड दौऱ्यांमध्ये येथे सहा कसोटी सामने खेळले असून दोन विजय व चार पराभव अशी भारताची येथील कामगिरी आहे. ढगाळ वातावरणात या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजी अधिकच घातक ठरते आणि इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारताचा डाव गडगडतो, असा पूर्वेतिहास आहे. १९६७ आणि २००२ या दोन दौऱ्यांमध्ये भारतीय संघास या खेळपट्टीवर ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला होता. त्यांपैकी, १९६७ साली मन्सूर अली पतौडी यांच्या झुंजार शतकामुळे भारताने फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात ५१० धावा करून डावाने पराभव टाळला होता. २००२च्या कसोटीत राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांनी शतके झळकावून भारताला पहिल्या डावात ८ बाद ६२८ धावांपर्यंत पोहचवले होते. या धावसंख्येच्या जोरावर भारताने भारताने हा सामना एक डाव ४६ धावांनी जिंकला होता. (Headingley Test)
भारताचा या स्टेडियमवरील पहिला कसोटीविजय १९८६च्या दौऱ्यातील असून त्या कसोटीत दिलीप वेंगसरकर यांनी पहिल्या डावात नाबाद १०२ धावा केल्या होत्या. मात्र, त्या विजयामध्ये भारताच्या गोलंदाजांचा सिंहाचा वाटा होता. पहिल्या डावात रॉजर बिनी व मदन लाल यांनी अनुक्रमे पाच व तीन विकेट घेऊन इंग्लंडा डाव १०२ धावांत संपवला होता. दुसऱ्या डावातही मनिंदर सिंगने ४ विकेट घेऊन इंग्लंडला १२८ धावांत गुंडाळले आणि भारताला २७९ धावांनी विजय मिळवून दिला. हे दोन अपवाद वगळल्यास भारताला दरवेळी या स्टेडियमवर पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. २०२१ च्या मागील दौऱ्यामध्ये भारताने या स्टेडियमवर एक डाव ७६ धावांनी पराभव पत्करला होता. त्या कसोटीत भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला होता. (Headingley Test)
या पार्श्वभूमीवर, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी येथील कोरडे हवामान हे भारतासाठी आशेचा किरण आहे. सध्या येथे तापमान ३० अंश सेल्सियस असून पुढील दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता नाही. खेळपट्टीवर थोड्या प्रमाणात गवत असले, तरी कोरड्या हवामानामुळे कसोटीच्या पहिल्या दिवसानंतर गवताचा प्रभाव उरणार नाही. या दौऱ्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघामधील बहुतांश फलंदाज प्रथमच इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणार आहेत. त्यामुळे, कोरडी खेळपट्टी ही भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करण्यासाठी सहायक ठरू शकते. त्याचप्रमाणे, भारताकडे रवींद्र जडेजा, कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर हे तीन फिरकीपटू आहे. कोरड्या खेळपट्टीवर त्यांच्या फिरकीची जादू चालल्यास भारताला ही कसोटी जिंकून मालिकेची सुरुवात विजयाने करण्याची संधी आहे.
हेही वाचा :
एका ‘टी-२०’त तब्बल तीन सुपर ओव्हर!
स्मृती मानधना पुन्हा अग्रस्थानी