साउदम्प्टन : सलामीवीरांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ३७ धावांनी पराभव केला. जेमी स्मिथ व बेन डकेट यांच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने उभारलेल्या ३ बाद २४८ धावांपुढे विंडीजला ८ बाद २११ धावाच करता आल्या. या सलग तिसऱ्या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. (England’s Series win)
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय विंडीजच्या अंगलट आला. स्मिथ व डकेट यांनी इंग्लंडला अवघ्या नऊ षटकांमध्येच १२० धावांची सलामी दिली. स्मिथने २६ चेंडूंमध्ये ४ चौकार, ५ षटकारांसह ६०, तर डकेटने ४६ चेंडूंमध्ये १० चौकार, २ षटकारांसह ८४ धावा फटकावल्या. अखेरच्या पाच षटकांमध्ये कर्णधार हॅरी ब्रुक व जेकब बेथेल यांनी तब्बल ७० धावा वसूल करून इंग्लंडला अडीचशे धावांनजीक पोहोचवले. ब्रुकने २२ चेंडूंमध्ये नाबाद ३५, तर बेथेलने १६ चेंडूंमध्ये नाबाद ३६ धावांची खेळी केली. (England’s Series win)
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचे दोन्ही सलामीवीर वैयक्तिक दहा धावांचा टप्पा ओलांडण्यापूर्वीच माघारी परतले. ठरावीक अंतराने विकेट पडत राहिल्यामुळे तेराव्या षटकात त्यांची अवस्था ६ बाद १२० अशी झाली होती. रोव्हमन पॉवेलने जेसन होल्डरसह सातव्या विकेटसाठी ५२ धावा जोडून विजयासाठी प्रयत्न सुरू ठेवले. परंतु, होल्डर बाद झाल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने योग्य साथ मिळाली नाही. पॉवेलने अखेरपर्यंत एकाकी लढत देत ४५ चेंडूंमध्ये ९ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या. इंग्लंडकडून ल्यूक वूडने ३, तर आदिल रशीदने २ विकेट घेतल्या. डकेट सामनावीर ठरला, तर मालिकेत १६५ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जोस बटलरला मालिकावीर घोषित करण्यात आले. (England’s Series win)
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड – २० षटकात ३ बाद २४८ (जेमी स्मिथ ६०, बेन डकेट ८४, जेकब बेथेल नाबाद ३६, शर्फेन रुदरफोर्ड १-२०) विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज – २० षटकांत ८ बाद २११ (रॉव्हमन पॉवेल नाबाद ७९, शाय होप ४५, शिम्रॉन हेटमाएर २६, ल्यूक वूड ३-३१, आदिल रशीद २-३०).