Home » Blog » Jayant Narlikar : जयंत नारळीकर आणि कोल्हापूर

Jayant Narlikar : जयंत नारळीकर आणि कोल्हापूर

नारळीकरांचे पूर्वज पाटगावचे

by प्रतिनिधी
0 comments
Narlikar

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे मंगळवारी (२० मे) रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आंतररष्ट्रीय स्तरावर खगोल शास्त्रज्ञ म्हणून त्यांची जगाला ओळख होती. जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिजला केले. त्याकाळी जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केले होते. फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते. जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये फ्रेड हॉईल यांचा समावेश व्हायचा. त्याकाळात हॉईल-नारळीकर ही थिअरी प्रसिद्ध झाली होती. जगाची निर्मिती स्फोटातून झाली, या थिअरीचे दोघेही टीकाकार होते. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापुरात झाला. कोल्हापूरविषयी त्यांना ओढ होती. या ओढीतून त्यांनी ‘चार नगरांतील माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रात कोल्हापूरच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. (Jayant Narlikar)

फार पूर्वीच्या आठवणी

‘नारळीकर’ हे मूळचे कुठले? ह्या अनुत्तरित प्रश्नापासून ह्या आत्मवृत्ताची सुरुवात होते. ‘नारळीकर’ आणि ‘नारळकर’ हे एकाच नावापासून आले असे समजले जाते. पण ही दोनही आडनावे धारण करणारे कऱ्हाडे ब्राह्मण संख्येने फार नसावेत. देशपांडे, कुलकर्णी ह्या देशस्थ आणि जोशी, गोडबोले ह्या कोकणस्थांच्या तुलनेत नारळकर/नारळीकर हे नक्कीच विरळा. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाचे प्रख्यात प्राचार्य नारळकर आणि माझे वडील विष्णू वासुदेव नारळीकर यांची नावे वगळता मला इतर सुविख्यात नारळकर/नारळीकर माहीत नव्हते. अलीकडे त्यांत कुडाळ येथील न्यू इंग्लिश स्कूलचे हेडमास्तर ए. एस. नारळीकर यांच्या नावाची भर पडली. ठाणे येथील  महेश्वर दत्तात्रय बाक्रे यांनी सुमारे १९१३-१४ साली स्वतःच्या शिक्षणासाठी गुरुवर्य नारळीकर यांनी केलेल्या बहुमोल मदतीचा आणि मार्गदर्शनाचा गौरवपूर्ण उल्लेख केलेले पत्र मला पाहायला मिळाले.

पण कोल्हापूरचे नारळीकर, म्हणजे माझ्या वडिलांचे पूर्वज मूळचे पाटगावचे असे कोल्हापुरातल्या जाणकार ज्येष्ठांनी सांगितले, तेव्हापासून पाटगावला भेट द्यावी असे वाटत होते. मात्र तसा योग जमून यायला २००६ साल उजाडावे लागले.(Jayant Narlikar)

 २००६ : नोव्हेंबर ६; तारीख ६-११-६ उलटी वाचली तरी तीच राहते म्हणून माझ्या लक्षात आहे. या दिवशी सकाळी कोल्हापूरहून मी आणि सौ. मंगला पाटगावच्या दिशेने बाहेर पडलो. माझे एक आप्त श्रीकांत खंडकर व त्यांचे मित्र श्री. शिंदे व श्री. नाशिककर मार्गदर्शक म्हणून बरोबर होते. नारळीकर कुटुंब जिथून आले ते पाटगाव पाहायची माझी तमन्ना आज पूर्ण होणार होती.

मॉन्सूनच्या तडाख्यानंतर पुण्याच्या रस्त्यांची जी स्थिती होते तीच कोल्हापूरच्या रस्त्यांची पण झाली होती. ‘खड्डे पंचविशी’ संपल्यावर महामार्ग सुरू झाला तेव्हा मनातली ही कल्पना दृढ झाली की महामार्गाचे रसायन आणि कॉर्पोरेशनने बांधलेल्या वा दरवर्षी ‘दुरुस्त’ केलेल्या शहरी मार्गाचे रसायन यांत पुष्कळ फरक असणार. अन्यथा एक मार्ग खड्ड्यांनी भरून जातो आणि दुसरा यथास्थित असतो हे कसे?

दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही महामार्गावर डावीकडे वळण घेऊन एक छोटा रस्ता घेऊन पाटगाव खेड्याकडे आलो. सरळ मार्गाने गेलो असतो तर पुढे पाटगावचे धरण लागले असते. पण आम्हांला धरणापेक्षा खेडेच पाहायचे होते. खेड्याच्या आसपासची सस्यश्यामला भूमाता पाहून मन प्रसन्न झाले.

ग्रामस्थ, ज्येष्ठांनी आमचे स्वागत केले. तिथले जुने भद्रकालीचे देऊळ दाखवले. समोरच एक नवे देऊळही होते. पण जुन्या काळच्या आठवणी सांगणाऱ्या काही ज्येष्ठांनी आम्हांला शेतातून मार्ग काढत नदीशेजारी नेले. ‘ती पाहा, त्या तिकडे एकेकाळी काही ब्राह्मण कुटुंबे राहत होती.  जोशी, दीक्षित, ठकार, अग्निहोत्री, अभ्यंकर, जमदग्मी, शास्त्री आणि नारळीकर.’ शेताच्या एका दिशेला बोट दाखवत ते म्हणाले. आता तिथे वास्तूचा मागमूस नव्हता. आम्ही उभे होतो तिथे एका मंदिराचे भग्रावशेष होते. हे मंदिर नारळीकरांच्या घराला लागूनच असे. नदीचे पाच घाट नारळीकर, दीक्षित, जोशी, जमदग्नी व शास्त्री यांच्या नावे असत.

नारळीकर! म्हणजे माझे पूर्वज एकेकाळी ज्या ठिकाणी राहत होते त्या जागी मी येऊन पोचलो होतो. ‘नारळीकर’ हे नाव कशावरून आले असावे? ‘नारळी’ नामक गावातून आल्यामुळे? का नारळाच्या झाडांच्या लागवडीचे मालक असल्यामुळे? पण ह्यांसारख्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत. पाटगावमध्ये ऐकलेल्या गोष्टींनुसार नारळीकरांच्या परसात आंब्याची झाडे होती. तिथल्या काही झाडांना नारळाएवढे मोठे आंबे लागत असत म्हणून त्यांचे नाव पडले नारळीकर! पण हे उत्तर गृहीत धरले तर आणखी एक अनुत्तरित पोटप्रश्न उद्भवतो : मग नारळीकरांचे मूळ आडनाव काय होते?

असो ! माझे पूर्वज पाटगावहून कोल्हापुरात राहायला आले, इथून माझे पुराण सुरू होते.

आपल्या मनात आपल्या लहानपणच्या काही आठवणी ठळक तर काही आठवणी धूसर असतात. काही घटना तर अशा असतात की त्या आपण प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत की त्या अशा अशा घडल्या असे इतरांनी आपल्याला वारंवार सांगितल्यामुळे आपल्या स्मृतिपटलावर त्या बिंबल्या गेल्या आहेत हे सांगणे अवघड जाते. आज अगदी लहानपणीच्या आठवणी गोळा करताना हाच प्रश्न पडतो… तरी मी प्रयत्न करणार आहे, माझ्या प्रत्यक्ष आठवणींवर भर देण्याचा. पण तत्पूर्वी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो :(Jayant Narlikar)

माझा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरला झाला. कोल्हापूर ही कोल्हापूर संस्थानाची राजधानी. छत्रपती संभाजीच्या मृत्यूनंतर मराठी राज्याची धुरा शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पुत्राने-राजाराम याने सांभाळली, व त्याची पत्नी ताराबाई हिने राज्याला स्थैर्य दिले. पुढे संभाजीचा मुलगा शाहू हा महाराष्ट्रात परत आल्यावर मराठी राज्यात दुफळी निर्माण झाली. बहुतेक भाग छत्रपती शाहूच्या पक्षात सामील झाला आणि ह्या राज्याची राजधानी सातारा झाली. ताराबाईचे समर्थक वेगळे झाले आणि छत्रपतींची गादी कोल्हापुरात स्थिरावली. मात्र पुढे पेशवे… शाहू छत्रपतींचे पंतप्रधान… अधिक कर्तृत्ववान व बलशाली झाल्यामुळे मराठी राज्याची वास्तविक राजधानी पुणे होती. पेशव्यांच्या ऐन भरभराटीत मराठी राज्याची हुकमत दिल्लीसकट उत्तर भारतात जाणवत होती. पण पुढे ही सत्ता कोसळली आणि एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी ब्रिटिशांनी पेशव्यांचे राज्य खालसा केले. दरम्यान ताराबाईच्या पक्षातला लहानगा भाग कोल्हापूर संस्थानात तग धरून होता. ह्या संस्थानापासून ब्रिटिशांना काही धोका संभवत नसल्याने त्यांनी ते चालू राहू दिले, व तेथील राजघराणे औरस किंवा दत्तक परंपरेने राज्याचे आदिपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध जोडू शके.

हा इतिहास सांगण्याचा उद्देश इतकाच की भारतीय स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा होईपर्यंत कोल्हापूर शहराचे वातावरण, जीवनपद्धती, समाजव्यवस्था काही अंशी पुणे-नाशिक आदी शहरांपेक्षा वेगळी होती. त्यांत संस्थानाची खास झलक असे. माझे आई-वडील कोल्हापूर संस्थानातच वाढले. दोघांचे पूर्वज पिढ्यानपिढ्या ह्या संस्थानातच राहिले. माझ्या आईचे वडील शंकर आबाजी हुजूरबाजार हे मूळचे श्रीखंडे; पण हुजूरबाजार घराण्यात दत्तक दिलेले. त्यापूर्वी देखील काही पिढ्यांत श्रीखंडे घराण्यातून हुजूरबाजार घराण्यात दत्तक पुत्र देण्याचे प्रसंग घडले होते. ‘हुजूरबाजार’ हे नाव मुळात संस्थानामधील हुद्यावरून आले होते… हुजुरांचा बाजार पाहणारे! परंतु माझ्या आजोबांच्या, शंकर आबाजी हुजूरबाजार-यांच्या वेळेपर्यंत ही बाजारावर देखरेख करण्याची जबाबदारी संपुष्टात आली होती. माझे आजोबा शाळेत शिक्षक होते.

माझ्या वडिलांचे वडील वासुदेवशास्त्री नारळीकर हे संस्कृत पंडित व प्रवचनकार होते. त्यांची प्रवचने विद्वत्तापूर्ण व रसाळ असत, असे ती प्रत्यक्ष श्रवण केलेल्या काही वडीलमंडळींकडून मी लहानपणी ऐकले होते. खुद्द माझ्या वडिलांकडून त्यांच्याबद्दल काही कळू शकले नाही, कारण आजोबा गेले तेव्हा वडील केवळ दहा वर्षांचे होते.

माझ्या आजोबांचा जन्म १८४८ सालचा. म्हणजे वडील जन्मले तेव्हा आजोबांचे वय साठ होते. एकदा काही परदेशी मित्रांपुढे मी बढाई मारत होतो की माझ्या निकट पूर्वजांचा काळ भूतकाळातल्या ऐतिहासिक घटनांशी जोडलेला होता. हे सांगताना मी म्हटले की १८५७च्या क्रांतीच्या वेळी माझे आजोबा ९ वर्षांचे होते. हे ऐकून माझे एक शिक्षक प्राध्यापक हरमन बॉण्डी म्हणाले, ‘माझी मावस आजी तर नेपोलियनच्या लढायांच्या काळात (म्हणजे १८१०-१५च्या सुमारास) जन्मली होती.

महाद्वार रोडवरील नारळीकरांचा वाडा एकेकाळी मोठा होता, पण त्याचा पुढचा भाग रस्तारुंदीकरणात पाडण्यात आला असे बुजुर्ग लोक सांगत. माझे वडील तीन भावांपैकी सर्वांत लहान आणि तल्लख बुद्धीचे. त्यांचा जन्म १९०८ सालचा. शाळेत त्यांच्या बुद्धिमत्तेची छाप लहानपणापासूनच पडत गेली. आधी विद्यापीठ व मग राजाराम हायस्कूल दोन्ही ठिकाणी त्यांना कौतुक करणारे शिक्षक भेटले. म्हणून आजोबा गेल्यानंतर सुद्धा त्यांचे शिक्षण चालूच राहिले. मॅट्रिकच्या परीक्षेत चौथा नंबर पटकावून व शिष्यवृत्त्या मिळवून ते कॉलेजच्या शिक्षणासाठी मुंबईत आधी एल्फिन्स्टन कॉलेज व नंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेले. बी.एस्सी. परीक्षेत रेकॉर्ड मार्क मिळवून ते प्रथम आले. त्यांचे नाव रॉयल इन्स्टिट्यूटऑफ सायन्सच्या ‘रोल ऑफ ऑनर’ वरती कोरलेले आहे. त्यानंतर १९२८-३२ या काळात ते केंब्रिजमध्ये उच्चशिक्षणासाठी होते. केंब्रिजमधील शिक्षण त्यांना शक्य झाले याचे कारण, माझ्या वडिलांना जे.एन. टाटा एंडाउमेंटतर्फे शिष्यवृत्ती मिळाली नि कोल्हापूर दरबारतर्फे कर्जही उपलब्ध झाले. अर्थात ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानात नोकरी करणे आवश्यक होते. गणिताच्या ट्रायपॉसमध्ये स्टार रँग्लरची उपाधी मिळवून संशोधनात रॅले प्राइझ व आयॉक न्यूटन स्टुडंटशिपचे ते मानकरी झाले. ते भारतात परतले ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आणि गणित विभागाचे प्रमुख म्हणून… अवघ्या २४व्या वर्षी.

माझे वडील केंब्रिजमध्ये शिकत असताना बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीयजी राउंड टेबल कॉन्फरन्ससाठी १९३१ साली इंग्लंडला गेले होते. एक प्रतिभावान होतकरू गणिती म्हणून माझ्या वडिलांची कीर्ती त्यांच्यापर्यंत पोचली होती. आपल्या विद्यापीठाकडे हुशार विद्वानांना शिक्षक म्हणून आकर्षित करण्याचे धोरण मालवीयजी कित्येक वर्षे राबवीत आले होते. लंडनला गेल्यावर ते मुद्दाम वेळ काढून माझ्या वडिलांना भेटले आणि त्यांना विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून येण्याचे आमंत्रण दिले. ‘तुमचे येथील शिक्षण संशोधन पूर्ण झाले की मला बनारसमध्ये भेटा-आपण तुमची निवड पक्की करू!’ हे आश्वासन मालवीयांनी पाळले. कारण १९३२ साली सुट्टीकरता माझे वडील केंब्रिजहून भारतात आले तेव्हा त्यांना आग्रह करून मालवीयांनी आपल्या विद्यापीठात त्यांची नेमणूक केली. त्यामुळे पुढे केंब्रिजला परतण्याचा आणि एखादे वर्ष अमेरिकेतल्या माउंट विल्सन वेधशाळेत काम करण्याचा आपला इरादा त्यांनी बदलला. इतकेच नव्हे तर माझ्या वडिलांना विद्यापीठात नोकरी करता यावी म्हणून मालवीयजींनी कोल्हापूर सरकारचे कर्ज विद्यापीठातर्फे फेडले.(Jayant Narlikar)

हुजूरबाजारांचा मोठा वाडा भेंडेगल्लीच्या तोंडाशी, शिवाजी चौकापासून हाकेच्या अंतरावर होता. ‘होता’ म्हणायचे कारण अलीकडे वाडा पाडून तिथे अपार्टमेंट, ब्लॉक व दुकाने बांधण्यात आलीत. नारळीकरांची वास्तू त्या मानाने लहान, तरी तिचे पण असेच रूपांतर झाले. हे घर महाद्वार रोडवर अंबाबाईच्या देवळाच्या मुख्य द्वारापासून शंभर-दीडशे मीटरवर असेल. दोन्हीही घरे भुईसपाट झाली तेव्हा मला चुकल्या चुकल्यासारखे झाले… कारण दोन्ही घरांशी माझ्या अनेक सुखद आठवणी जोडल्या आहेत. जुन्या वास्तू सांभाळून, नवीन साधनांनी सुरक्षित करून टिकवण्याची आणि आधुनिक सुखसोयींनी सज्ज करण्याची कला अजून आपल्याला साधली नाही, हे खरे.

हुजूरबाजार वाड्याशी माझा संबंध उन्हाळी सुट्ट्यात येई. मला पाच मामा व दोन मावश्या. वर्षा-दोनचार वर्षातून एकदा असे आमचे कोल्हापूरला जाणे होई, तेव्हा तेथील वडील मंडळीकडून होणारे कौतुक आणि समवयस्क मुलांबरोबर हुंदडणे यांत सुट्टीचे दोन महिने कसे जात ते कळत नसे. पाच भाऊ, तीन बहिणी अशा भावंडांत माझी आई कृष्णा (लग्नानंतर सुमती) नंबर दोनची. तिची मोठी बहीण इंदिरा (तिला सर्व जण ‘आक्का’ म्हणत) फार शिक्षण न घेता लवकर लग्न होऊन सासरी गेली. तिचे सासर, मोघ्यांच्या घरी, भेंडेगल्लीत हुजूरबाजार वाड्यासमोरच होते. माझ्या आईने मात्र लहानपणापासूनच ‘स्कॉलर’ हा किताब पटकावला. तिला शाळेत ती बारा वर्षांची असताना वॉलर प्राइझ म्हणून मिळालेले चांदीचे भक्कम भांडे अजून आमच्या संग्रही आहे. तिची शिक्षणातील प्रगती आणि आवड पाहून तिच्या वडिलांनी तिला एम.ए. पर्यंत शिकायची मुभा दिली. १९३० च्या दशकात निवडक मुलीच उच्चशिक्षण घेत. पुष्कळदा माझी आई वर्गात एकटीच मुलगी असायची. तिच्याहून धाकटी कुसुम मावशी पण उच्च शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात राहिली व आपल्या उत्तराश्रमात महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स स्कूल (एम.एल.जी) व विद्यापीठ हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेचे पद तिने भूषवले.

माझ्या आई-वडिलांचे लग्न ठरले तेव्हा अनेकांनी ‘रत्नं समागच्छतु कांचनेन’ असेच म्हटले. कारण विद्याक्षेत्रात दोघांचे नाव चमकले होते. २१ जून १९३७ रोजी नरसोबाच्या वाडीत कल्लू रुक्के पुजारी यांनी दोघांचे लग्न लावले. १९६५साली आई-वडिलांबरोबर नरसोबाच्या दर्शनास मी गेलो असताना लग्नसमारंभाची आठवण काढणारे अनेक लोक तिथे भेटले. पुढे २००८मध्ये मी तिथे सपत्नीक गेलो तेव्हा अशा लोकांची संख्या अर्थातच रोडावली होती. तरी पूर्वस्मृतींना उजाळा मिळाला.

माझे सर्वच मामा ‘स्कॉलर’ म्हणून ओळखले जात. सर्वांत वडील दादामामा (गोविंद) टाटा पॉवर कंपनीत अभियंता होते. नानामामा (नारायण) न्यायाधीश, वसंतमामा स्टॅटिस्टिक्सचे प्राध्यापक, मोरूमामा (मोरेश्वर) गणिताचे प्राध्यापक तर मुकुंदमामा कोल्हापुरातच केमिस्ट्रीचे शिक्षक. वसंतमामांनी केंब्रिज विद्यापीठात पीएच.डी. केली तर मोरूमामांनी मॉस्को विद्यापीठात बीजगणितात संशोधन केले. दोघे बंधू बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत चान्सेलर्स मेडलचे मानकरी होते-वसंतमामा १९४२ मध्ये तर मोरूमामा १९५२ साली. माझा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात दाभोळकर नर्सिंग होममध्ये झाला. माझे वडील बनारस येथे स्थायिक झाले असले तरी बाळंतपणासाठी आई तिच्या माहेरी कोल्हापुरात आली होती. जन्मानंतर काही महिन्यांनी ती मला घेऊन बनारसला आली… आणि विद्यापीठाच्या आवारात माझं बालपण गेलं.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00