Home » Blog » Mumbai Indians : मुंबईचा सलग पाचवा विजय

Mumbai Indians : मुंबईचा सलग पाचवा विजय

लखनौला ५४ धावांनी नमवून गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप

by प्रतिनिधी
0 comments
Mumbai Indians

मुंबई : रिकलटन व सूर्यकुमारची अर्धशतके आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने रविवारी लखनौ सुपरजायंट्सला ५४ धावांनी पराभूत केले. आयपीएलच्या अठराव्या मोसमामध्ये मुंबईचा हा सलग पाचवा विजय असून याबरोबरच मुंबईने १२ गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. (Mumbai Indians)

वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यामध्ये लखनौने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रायन रिकलटन व रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने सुरुवातीच्या तीन षटकांमध्येच ३३ धावा फटकावल्या. दुखापतीनंतर दीर्घकाळाने पुनरागमन करणारा लखनौचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने रोहितला १२ धावांवर बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर, रिकलटन आणि विक जॅक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. जॅक्स २९ धावांवर बाद झाला, तर रिकलटनने ३२ चेंडूंमध्ये ६ चौकार व ४ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर तिलक वर्मा व कर्णधार हार्दिक पंड्याही स्वस्तात परतले. मात्र, सूर्यकुमारने एका बाजूने फटकेबाजी करत संघाची धावगती कमी होऊ दिली नाही. सूर्याने २८ चेंडूंमध्ये प्रत्येकी ४ चौकार व षटकारांच्या साहाय्याने ५४ धावा फटकावल्या. याबरोबरच, त्याने यंदाच्या मोसमातील ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आघाडी घेतली. अखेरच्या षटकात कॉर्बिन बॉश व नमन धीरच्या फटकेबाजीमुळे मुंबईला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. (Mumbai Indians)

मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहने सलामीवीर एडन मार्करमला बाद केले. सातव्या षटकात विल जॅक्सने दोन चेंडूंच्या अंतराने निकोलास पूरन व कर्णधार रिषभ पंतला बाद केले. त्यानंतर, मिचेल मार्श आणि आयुष बदोनीने दहाव्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. या दोघांनाही ट्रेंट बोल्टने बाद केले. मार्शने २४ चेंडूंमध्ये ३ चौकार, २ षटकारांसह ३४, तर बदोनीने २२ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार, षटकारांसह ३५ धावा केल्या. सोळाव्या षटकामध्ये बुमराहने तीन विकेट घेऊन लखनौच्या उरल्यासुरल्या आशाही संपवल्या. बुमराहने २२ धावांत ४ विकेट घेतल्या.याबरोबरच बुमराहने मुंबईतर्फे आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अग्रस्थान पटकावले. त्याने १७१ विकेट घेणाऱ्या लसिथ मलिंगाला मागे टाकले असून बुमराहच्या नावावर आता १३९ सामन्यांत १७४ विकेट आहेत. विसाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बॉशने दिग्वेश राठीची विकेट काढत लखनौचा डाव संपवला. (Mumbai Indians)

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स – २० षटकांत ७ बाद २१५ (सूर्यकुमार यादव ५४, रायन रिकलटन ५८, विल जॅक्स २९, मयंक यादव २-४०, आवेश खान २-४२) विजयी विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स – २० षटकांत सर्वबाद १६१ (मिचेल मार्श ३४, आयुष बदोनी ३५, निकोलास पूरन २७, जसप्रीत बुमराह ४-२२, ट्रेंट बोल्ट ३-२०, विल जॅक्स २-१८).

हेही वाचा :

भारतीय महिलांची विजयी सलामी

You may also like

error: Content is protected !!